भारताचा रशियासोबत रायफल करार, अमेठीत उभारणार AK-203 चा कारखाना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 11:05 AM2019-02-14T11:05:59+5:302019-02-14T11:07:32+5:30
अमेरिकन कंपनीसोबत 72 हजार 400 असॉल्ट रायफल खरेदीसाठी करार केल्यानंतर भारत सरकारने संरक्षण सामुग्रीसाठी अजून एक मोठा करार करण्याबाबत निर्णय घेतला आहे.
नवी दिली - अमेरिकन कंपनीसोबत 72 हजार 400 असॉल्ट रायफल खरेदीसाठी करार केल्यानंतर भारत सरकारने संरक्षण सामुग्रीसाठी अजून एक मोठा करार करण्याबाबत निर्णय घेतला आहे. रशियासोबत मिळून सात लाख 47 हजार कलाश्निकोव रायफल निर्माण करण्यासाठी करार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने बुधवारी संध्याकाळी घेतला. या करारांतर्गत उत्तर प्रदेशातील अमेठी येथे कारखाना उभारण्यात येणार आहे.
भारत आणि रशियाच्या सरकारांमध्ये होणाऱ्या या करारांतर्गत रशियाची कलाश्निकोव कंसर्न आणि भारताची ऑर्डिंनन्स फॅक्टरी बोर्ड मिळून एके-47 च्या तिसऱ्या पिढीमधील एके-203 रायफल विकसित करणार आहेत. दोन्ही देशांमध्ये याबाबतच्या करारावर या आठवड्या अखेरीस स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी या करारासंदर्भातील रक्कम, कालावधी आणि अन्य महत्त्वपूर्ण माहिती समोर येईल.
संरक्षण मंत्रालयाने साडे सहा लाख रायफल्सची खरेदी करण्यासाठी स्वारस्य पत्र मागवले होते. संरक्षण मंत्रालयाच्या त्याच प्रस्तावांतर्गत हा करार होत आहे. विशेष बाब म्हणजे या रायफल्सची निर्मिती मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत भारतातच करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या धोरणानुसार कारखान्याचे 50.5 टक्के शेअर्स ऑर्डिन्स फॅक्टरीकडे तर रशियाकडे 49.5 टक्के शेअर्स असतील.
दरम्यान, केंद्र सरकारने 72 हजार 400 असॉल्ट रायफल खरेदी करण्यासाठी याच आठवड्यात एका अमेरिकन कंपनीसोबत करार केला आहे. फास्ट ट्रॅक प्रोक्टोरमेंटअंतर्गत एसआयजी जॉर असॉल्ट रायफल्ससाठी अमेरिकेसोबत करार करण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्याने म्हटले आहे.