योगविद्येत भारताचे अधिपत्य जगाला मान्य
By admin | Published: June 21, 2017 02:26 AM2017-06-21T02:26:33+5:302017-06-21T07:19:30+5:30
येत्या आंतरराष्ट्रीय योग दिनी २00 देशांमध्ये योगाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. जगभरातील प्रतिसाद पाहता, योगविद्येच्या क्षेत्रातील भारताचे अधिपत्य साऱ्या जगाने मान्य केले आहे,
येत्या आंतरराष्ट्रीय योग दिनी २00 देशांमध्ये योगाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. जगभरातील प्रतिसाद पाहता, योगविद्येच्या क्षेत्रातील भारताचे अधिपत्य साऱ्या जगाने मान्य केले आहे, असे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांची सुरेश भटेवरा यांनी घेतलेली मुलाखत...
तिसरा आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी आहे. तो देश-परदेशांमध्ये कसा साजरा होईल?
लखनौ येथील तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे योगगुरू बाबा रामदेव आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमवेत सहभागी होतील. दिल्लीच्या राजपथावर २0१५ साली आणि २0१६ साली चंदीगड येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे मुख्य कार्यक्रम झाले. दरवर्षी या कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसाद वाढत असून, यंदा लखनौच्या रमाबाई आंबेडकर मैदानात, तिसऱ्या भव्य कार्यक्रमाच्या सामुदायिक योगसाधनेत किमान ५५ हजार लोक सहभागी होतील. या खेरीज मोदी सरकारचे ७२ केंद्रीय मंत्री, देशातल्या ७0 वेगवेगळ्या शहरांत योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. राजधानी दिल्लीत नवी दिल्ली महापालिका (एनडीएमसी), दिल्ली विकास प्राधिकरण (डीडीए) व योग क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने ७ वेगवेगळ्या ठिकाणी मोठे कार्यक्रम आयोजित केले आहेत.
संयुक्त राष्ट्र महासभेने पंतप्रधान मोदींच्या आवाहनानुसार, आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी २१ जूनचा दिवस निश्चित केला. गेली दोन वर्षे विविध देशांत अत्यंत मोठ्या प्रमाणावर योग दिन साजरे झाले. यंदा जगातले २00 देश या उपक्रमात सहभागी होत आहेत. पॅरिसला आयफेल टॉवरसमोरचे मैदान, लंडनला ट्रॅफलगर चौक, तर न्यूयॉर्कला सेंट्रल पार्क ही त्यातली काही प्रमुख ठिकाणे. जगभर मिळणारा प्रतिसाद पाहता, योगविद्येच्या क्षेत्रातील भारताचे अधिपत्य साऱ्या जगाने मान्य केले आहे, असे म्हटले, तर अतिशयोक्ती होणार नाही.
योग दिनाच्या कार्यक्रमाखेरीज देशात योग विद्येच्या प्रसारासाठी आयुष मंत्रालयाने कोणते उपक्रम हाती घेतले आहेत?
आयुष मंत्रालयातर्फे भारतात १00 मोठे योगा पार्क तयार करण्याचा भव्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, २0१७ च्या नव्या राष्ट्रीय आरोग्य धोरणात शालेय शिक्षण, तसेच कार्यालयीन कामकाजात तणाव घालवण्यासाठी योगविद्येचा समावेश करण्यात आला आहे. शालेय शिक्षणांतर्गत योगाभ्यासाचे संचालन राष्ट्रीय आयुष मिशनकडे सोपवण्यात आले आहे. त्यात केवळ योगाभ्यासच नव्हे, तर स्वच्छता शिक्षण, सकस आहार व आयुष औषधोपचार पद्धतीचाही समावेश आहे. आरोग्य धोरणात योगविद्येसह आयुर्वेद, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी इत्यादी आयुष उपचार पद्धतींना प्राधान्य देण्याची तरतूद आहे. योगाभ्यासाच्या व्यापक विस्तारासाठी योगविद्या प्रसार व विकास कार्यात, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व्यक्ती व संस्थांना पंतप्रधान पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. पुरस्कारांसाठी पात्र व्यक्ती व संस्थांची नावे सुचवण्यासाठी आयुष मंत्रालय सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्र समिती आहे. दोन्ही प्रवर्गातल्या पुरस्कार प्राप्त व्यक्ती व संस्थांची निवड कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखालील ज्युरी समिती करणार आहे.
खासगी व सार्वजनिक क्षेत्रात कार्यालयीन कामकाजात योगाभ्यासाचा अंतर्भाव व्हावा, यासाठी गतवर्षी फेडरेशन आॅफ इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की), इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट्स यासारख्या संस्था व मोठ्या कॉर्पोरेट संस्थांना आयुष मंत्रालयाने आवाहन केले. धकाधकीच्या आयुष्यात मानसिक तणाव, कामकाजातून होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी, कार्यालयीन वेळेत योगाभ्यासाठी सक्तीने किमान ३0 मिनिटे वेळ राखून ठेवावा, असे हे आवाहन होते. काही प्रमाणात त्यास प्रतिसाद मिळतो आहे.
केंद्रात भारतीय चिकित्सा व होमिओपॅथी (आयएसएमएच) विभाग, मार्च १९९५ पासून कार्यरत होता. या विभागाचे आयुर्वेद, योग, प्राकृतिक चिकित्सा, युनानी, सिद्ध व होमिओपॅथी विभागांसह आयुष मंत्रालयात २00३ साली रूपांतर झाले. गेल्या ३ वर्षांत या मंत्रालयाची महत्त्वाची कामगिरी कोणती?
योग दिनाबद्दल मी विस्ताराने माहिती दिली आहेच. याखेरीज अ. भा. आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) रुग्णालयाच्या धर्तीवर राजधानी दिल्लीच्या रोहिणी भागात केवळ आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी इत्यादी भारतीय उपचार पद्धतीचे भव्य रुग्णालय उभे राहिले आहे. या रुग्णालयाचा ओपीडी विभाग अलीकडेच सुरू झाला असून, अन्य उपचारांची सुसज्ज यंत्रणा लवकरच कार्यरत होईल. पुणे येथे २00 खाटांच्या मोठ्या निसर्गोपचार केंद्रासह नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ नेचरोपथीची उभारणी होत आहे. कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराच्या उपचारासाठी मुंबईच्या टाटा हॉस्पिटलवर सध्या खूप भार पडतो. ही बाब लक्षात घेऊ न मुंबईत भांडुप येथे नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ अॅलोपथीबरोबर आयुर्वेद उपचार पद्धतीचे भव्य संयुक्त रुग्णालय उभारण्याची योजना आहे. नगरविकास मंत्रालयाने या केंद्रासाठी खार जमिनीलगतची जागा उपलब्ध करून दिली आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटकांची लक्षणीय संख्या लक्षात घेता, गोव्यातही नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ आयुर्वेद, निसर्गोपचार व योगाचे केंद्र मोठ्या प्रमाणावर सुरू करण्याचा विचार आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे आंतरराष्ट्रीय स्तराचे निसर्गोपचार आणि योग केंद्र उभारण्याची तयारी सुरू आहे. एमबीबीएस, बीडीएस अभ्यासक्रमांच्या धर्तीवर आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, सिद्ध, युनानी इत्यादी उपचार पद्धतींमधील आयुष अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेद्वारे (एनईईटी) प्रवेश देण्याची तयारी आयुष मंत्रालयाने चालवली आहे. पुढल्या वर्षी ही यंत्रणा बऱ्यापैकी कार्यान्वित होईल, अशी अपेक्षा आहे.