भारताचा पाकिस्तानवर पुन्हा 'सर्जिकल स्ट्राईक', POK मध्ये 45 मिनिटं केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 11:53 AM2017-12-26T11:53:39+5:302017-12-26T12:12:12+5:30
पाकिस्तानच्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाल्यानंतर भारतीय लष्कराने लगेचच जशास तसे उत्तर दिले आहे. भारतीय लष्कराच्या जवानांनी सोमवारी रात्री पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये घुसून स्पेशल ऑपरेशन केले.
नवी दिल्ली - पाकिस्तानच्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाल्यानंतर भारतीय लष्कराने लगेचच जशास तसे उत्तर दिले आहे. भारतीय लष्कराच्या जवानांनी सोमवारी रात्री पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये घुसून स्पेशल ऑपरेशन केले. भारताच्या या कारवाईत पाकिस्तानचे चार सैनिक ठार झाले. भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या रावळकोट सेक्टरमधील रुख चकरी परिसरात प्रवेश केल्यानंतर त्याठिकाणी गस्तीवर असलेल्या चार पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातले.
शनिवारी पाकिस्तानच्या गोळीबारात मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्यासह दोन जवान शहीद झाले होते. भारताने सोमवारी याच हल्ल्याचा हिशोब चुकता केला. भारत या कारवाईला सर्जिकल स्ट्राईकचे नाव देत नसला तरी ही कारवाई सर्जिकल स्ट्राईक सारखीच होती. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार लष्कराने या कारवाईत अनेक पाकिस्तानी चौक्या उद्धवस्त केल्या.
शनिवारी पाकिस्तानच्या गोळीबारात एक मेजर आणि दोन जवान शहीद झाल्यानंतर भारतीय लष्कराने आम्ही या नापाक कारवाईला उत्तर देऊ. वेळ आणि ठिकाण आम्ही ठरवू असे स्पष्ट केले होते. भारतीय लष्कराच्या या कारवाईत चार पेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याची शक्यता आहे. भारतीय सैन्य नियंत्रण रेषा ओलांडून 500 मीटर आतपर्यंत घुसले होते.
भारतीय सैन्याने नियंत्रण रेषेजवळ आयईडी स्फोटके पेरुन पाकिस्तानी सैनिकांना जाळयात अडकवण्याचा ट्रॅप रचला होता. त्यानंतर लाईट मशिनगमधून फायरिंग केली त्यात चार सैनिक ठार झाले. जवळपास 45 मिनिटे ही कारवाई सुरु होती असे वृत्त इंडियाने टुडेने दिले आहे. स्थानिक कमांडरने परिस्थितीनुसार थेट पीओकेमध्ये घुसून ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला असे सूत्रांनी सांगितले. ही कारवाई पाकिस्तानसाठी एक इशारा आहे. यापुढे पाकिस्तानने भारतीय जवानांवर हल्ले केले तरच अशीच कारवाई करु असे सूत्रांनी सांगितले.
मागच्यावर्षी उरी दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराच्या स्पेशल फोर्सेसने पीओकेमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्यात अनेक दहशतवादी मारले गेले होते. कालच पाकिस्तानात जाऊन कुलभूषण जाधव यांची त्यांच्या आई आणि पत्नीने भेट घेतली होती. त्याच दिवशी भारतीय लष्कराने ही कारवाई केली.