भारताचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय; पंतप्रधान मोदी म्हणाले, "क्रिकेट असो किंवा लसीकरण..."
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 12:10 AM2021-09-07T00:10:41+5:302021-09-07T00:11:55+5:30
India vs England 4th test : भारतानं इंग्लंडचा पराभव करत मिळवला ऐतिहासिक विजय.
India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : पाचव्या दिवसाच्या सत्रात ड्रायव्हर सीटवर बसलेल्या इंग्लंडला लंच ब्रेकनंतर टीम इंडियानं भिरकावून लावलं. रवींद्र जडेजा व जसप्रीत बुमराह या जोडीनं ६ धावांत इंग्लंडचे चार फलंदाज माघारी पाठवले. त्यामुळे एकवेळ २ बाद १४१ अशा सुस्थितित असलेला इंग्लंडचा डाव ६ बाद १४७ असा गडगडला. हा सामना ड्रॉ करण्याचा इंग्लंडचा मानस भारतीय गोलंदाजांनी डळमळीत केला. तळाच्या चार फलंदाजांना सोबत घेऊन ५४ षटकं खेळून काढणं हे अवघडच होतं, तरीही कर्णधार जो रूटनं १३ षटकं खेळली. पण, शार्दूल ठाकूरनं (Shardul Thakur) त्याचा त्रिफळा उडवून टीम इंडियाचा विजय पक्का केला. शार्दूलनं दोन्ही डावांत अर्धशतकी खेळी केली शिवाय गोलंदाजीतही योगदान दिलं. इंग्लंड व ऑस्ट्रेलियात एकापेक्षा अधिक कसोटी जिंकणारा विराट कोहली हा आशियातील पहिला कर्णधार ठरला. या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा दिल्या.
"लसीकरणाच्या मोहिमेत आणि क्रिकेटच्या खेळपट्टीवर पुन्हा एकदा महान दिवस. नेहमीप्रमाणेच 'टीम इंडियाचा' विजय," असं पंतप्रधाननरेंद्र मोदी म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून अनोख्या पद्धतीनं भारतीय संघाच्या विजयावर शुभेच्छा दिल्या.
Great day (again) on the vaccination front and on the cricket pitch. As always, #TeamIndia wins! #SabkoVaccineMuftVaccine
— Narendra Modi (@narendramodi) September 6, 2021
"आप लोग रोना बंद किजिए"
भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग यानंदेखील अनोख्या पद्धतीनं टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या. त्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आप लोग रोना बंद किजिए असं लिहिलेलं एक मिम शेअर केलं. तसंच सोबत त्यानं एक कॅप्शनही लिहिलं आहे. 'भारत केवळ भारतातीलच टर्निग ट्रॅकवर जिंकतो त्यांच्यासाठी टीम इंडियाकडून' अशा शब्दात त्यानं सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या.
सचिन तेंडुलकरकडूनही शुभेच्छा
"जबरदस्त पुनरागन. प्रत्येक धक्क्यानंतर सर्वांनी पुनरागमन केलं. अजून पल्ला गाठायचा आहे. ३-१ नं इंग्लंडचा पराभव करूया," असं म्हणत भारतीय संघाचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर यानं म्हटलं आहे. त्यानं ट्विटरद्वारे टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या.