पाकिस्तानच्या सीमेजवळ भारताचे जाेरदार शक्तिप्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 06:49 AM2021-09-10T06:49:15+5:302021-09-10T06:49:58+5:30
भारत-पाक सीमेपासून ४० किमी अंतरावर बाडमेर जिल्ह्यातील गंधव-बखसर विभागात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९२५ वर आपातकालीन लँडिंग फिल्ड तयार करण्यात आले आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
जयपूर : पाकिस्तानच्या सीमेजवळ भारताने संरक्षण क्षमतेचे जाेरदार प्रदर्शन केले. राजस्थानमध्ये बाडमेरजवळ राष्ट्रीय महामार्गावर तयार केलेल्या भारतातील ‘आपातकालीन लँडिंग फिल्ड’चे उद्घाटन करण्यात आले. सुखाेई व जॅग्वार या लढाऊ विमानांसह सुपर हर्क्युलस या विमानांनी महामार्गावर यशस्वी लँडिंग केले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासाेबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेदेखील सुपर हर्क्युलसमध्ये स्वार हाेते.
भारत-पाक सीमेपासून ४० किमी अंतरावर बाडमेर जिल्ह्यातील गंधव-बखसर विभागात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९२५ वर आपातकालीन लँडिंग फिल्ड तयार करण्यात आले आहे. सुखाेई आणि जॅग्वार या लढाऊ विमानांचे प्रथमच महामार्गावर लँडिंग करण्यात आले. तर राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांना घेऊन सुपर हर्क्युलस हे अजस्त्र विमानही महामार्गावर उतरले. उद्घाटन समाराेहाला चीफ ऑफ डिफेंस स्टाफ बिपिन रावत आणि एअर चीफ मार्शल आर. के. एस. भादुरिया हेदेखील उपस्थित हाेते.भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ही तीन किलाेमीटरची ही धावपट्टी तयार केली आहे. त्यासाठी ३३ काेटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. सुमारे १९ महिन्यांमध्ये काम पूर्ण करण्यात आले आहे. धावपट्टीची रुंदी ३३ मीटर आहे.
राजस्थानमध्ये महामार्गावर ‘आपातकालीन लँडिंग फिल्ड’चे उद्घाटन
१५ दिवसांमध्ये धावपट्टी बनवू : नितीन गडकरी
आपातकालीन लॅंडिंग फिल्ड बनविण्यासाठी १९ महिने लागले. मात्र, आम्ही केवळ १५ दिवसांमध्ये चांगल्या दर्जाच्या लॅंडिंग फिल्ड तयार करू, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वायुसेना प्रमुख भादुरिया यांना सांगितले. तसेच सशस्त्र दलांनी या ठिकाणी एक लहान विमानतळ तयार करायला हवे, असेही गडकरींनी बिपिन रावत यांना सांगितले. जवळपास ३५० किलाेमीटर परिसरात एकही विमानतळ नाही. त्यामुळे सशस्त्र दलांसाेबतच नागरिकांनाही फायदा हाेईल, असे गडकरी म्हणाले.
ऐतिहासिक क्षण- राजनाथ सिंह
महामार्गावर विमान उतरविणे हा एक ऐतिहासिक क्षण असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. आंतरराष्ट्रीय सीमेजवळ अशा पद्धतीची धावपट्टी तयार केल्यानंतर भारताच्या संरक्षण क्षमतेत वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.
जर्मनी, स्वीडन, दक्षिण काेरिया, सिंगापूर, तायवान, स्वित्झर्लंड इत्यादी देशांमध्ये अशा प्रकारच्या धावपट्ट्या आहेत. उत्तर प्रदेशात लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वेवर अशी एक धावपट्टी ऑपरेशनल आहे. त्यावर २०१७ मध्ये वायुसेनेकडून चाचणी करण्यात आली हाेती.