पंतप्रधान मोदींवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर भारताची कठोर भूमिका, मालदीवचे उच्चायुक्त स्पष्टीकरण देण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयात पोहोचले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 10:21 AM2024-01-08T10:21:43+5:302024-01-08T10:22:45+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा मालदीववर मोठा परिणाम होताना दिसत आहे.
Pm Narendra Modi ( Marathi News ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा मालदीववर मोठा परिणाम होताना दिसत आहे. आधी सोशल मीडियावर मालदीववर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू झाली, त्यानंतर आघाडीच्या भारतीय ट्रॅव्हल कंपन्यांनी मालदीवसाठी फ्लाइट आणि हॉटेल बुकिंग रद्द केले आणि आता भारत सरकारने मालदीवच्या उच्चायुक्तांना बोलावले आहे. भारत सरकारने समन्स बजावल्यानंतर मालदीवचे उच्चायुक्त इब्राहिम साहिब भारतीय परराष्ट्र मंत्रालयात पोहोचले आहेत.
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर परिसराचे काम वेगात; डिसेंबर २०२५ पर्यंत ७० एकरचा भाग पूर्ण
मालदीवच्या महिला मंत्री मरियम शियुना यांनी सोशल मीडियावर पीएम मोदींबद्दल आक्षेपार्ह कमेंट केली होती. भारताने मालदीवच्या मोहम्मद मुइज्जू सरकारकडे हा मुद्दा मांडला होता. माले येथील भारतीय उच्चायुक्तांनी मंत्र्यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला होता. भारताच्या आक्षेपानंतर मालदीव सरकारने हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे निवेदन जारी केले.
भारताच्या तीव्र आक्षेपानंतर कारवाई करत मालदीव सरकारने मंत्री मरियम शिउना तसेच मलशा शरीफ आणि महजूम मजीद यांना पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल निलंबित केले. मालदीव सरकारचे प्रवक्ते, मंत्री इब्राहिम खलील यांनी सांगितले की, वादग्रस्त कमेंटसाठी जबाबदार असलेल्या तीन मंत्र्यांना त्यांच्या पदांवरून तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला सुरुवात झाली होती. लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदींनी फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यासोबतच त्यांनी भारतीयांना या बेटाला भेट देण्याची योजना आखण्याचे आवाहन केले होते. यानंतर मालदीवच्या युवा सक्षमीकरण उपमंत्री मरियम शिउना यांनी पीएम मोदींच्या पोस्टवर आक्षेपार्ह टिप्पणी केली. मात्र, या ट्विटवर टीका झाल्यानंतर त्यांनी ते डिलीटही केले.