चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार भारताचे मानवरहित रोव्हर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 04:43 AM2019-07-13T04:43:23+5:302019-07-13T04:43:33+5:30
महत्त्वाकांक्षी मोहीम; खनिज, पाण्याचा शोध
नवी दिल्ली : अंतराळ संशोधनात मोठी झेप घेण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. अजुनही फारसे संशोधन न झालेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारत मानवरहित रोव्हर उतरविणार आहे. ही अशा प्रकारची चंद्रावर आखलेली भारताची दुसरी मोहिम असेल. ती यशस्वी झाल्यास चांद्रसंशोधनाबाबत सुरु असलेल्या जागतिक स्पर्धेत भारत आणखी चार पावले पुढे जाईल.
इंडियन स्पेस रिसर्च आॅर्गनायझेशनने (इस्रो) स्वदेशी तंत्रज्ञानाने बनविलेले रोव्हर अवकाशात येत्या सोमवारी प्रक्षेपित केले जाईल. ते सहा किंवा सात सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याची शक्यता आहे. १४.१ कोटी डॉलर खर्चाच्या या चांद्रयान-२ मोहिमेद्वारे चंद्राच्या जमिनीखालील खनिजांचा शोध घेण्यात येईल. या ग्रहाच्या पृष्ठभागाचा नकाशा तयार करणे, तेथे पाण्याचा शोध घेणे अशी कामे मानवरहित रोव्हर करणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर जिथे आतापर्यंत कोणताही देश पोहोचू शकलेला नाही तिथे भारताचा रोव्हर जाणार असल्याचे इस्रोच्या सूत्रांनी सांगितले. जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था बनण्याचे ध्येय मोदी सरकारने ठेवले असून अंतराळ संशोधन व सुरक्षाविषयक बाबींमध्येही आपला देश अग्रस्थानी असावा असे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
अमेरिकेनेही आखल्या महत्त्वाकांक्षी चांद्रमोहिमा
नील आर्मस्ट्राँग व बझ आल्ड्रिन या दोन अमेरिकी अंतराळवीरांनी चंद्रावर पाऊल ठेवल्याच्या अपोलो-११ मोहिमेला या महिन्यात २० जुलैला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमेरिका चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर २०२४ सालापर्यंत आपल्या अंतराळवीरांना नेण्याचे स्वप्न पाहात आहे.
चंद्रावर पाण्याचे अस्तित्व असल्याचा शोध भारताच्या चांद्रयान-१ मोहिमेद्वारे लागला होता. २०१३-१४ या कालावधीत मंगळाच्या कक्षेत उपग्रह नेण्याची कामगिरी भारताने केली होती.