भारताच्या लसी नव्या विषाणूंविरोधातही प्रभावी, मानवी चाचण्यांतील निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 07:30 AM2021-02-20T07:30:43+5:302021-02-20T07:31:17+5:30
Corona vaccine : आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले की, मूळ कोरोना विषाणूमध्ये परिवर्तन होऊन नवे विषाणू तयार होतात. त्यांच्या विरोधातील उपचारांत भारताने बनविलेल्या लसी (कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन) प्रभावी ठरत आहेत.
नवी दिल्ली : भारताने तयार केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसी या कोरोनाच्या नव्या विषाणूंविरोधातील उपचारांतही प्रभावी ठरल्या आहेत, हे या लसींच्या मानवी चाचण्यांतील अंतरिम निष्कर्षांतून आढळून आल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने म्हटले आहे.
आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले की, मूळ कोरोना विषाणूमध्ये परिवर्तन होऊन नवे विषाणू तयार होतात. त्यांच्या विरोधातील उपचारांत भारताने बनविलेल्या लसी (कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन) प्रभावी ठरत आहेत. त्यामुळे ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, ब्राझीलमध्ये सापडलेल्या नव्या कोरोना विषाणूंविरोधातील उपचारांत भारतीय लसी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत.
डॉ. भार्गव म्हणाले की, कोरोना विषाणूविरोधात सामूहिक शक्ती निर्माण होण्याची ब्रिटनसह काही देशांनी प्रतीक्षा केली. मात्र, त्यामुळे या संसर्गाचा आणखी फैलाव होण्यास मदतच झाली. मात्र, भारताने हा मार्ग न स्वीकारता तातडीने लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारला व अन्य उपाय योजले. त्यामुळे भारतात कोरोनामुळे अद्याप मोठी हानी झालेली नाही.
३४ दिवसांत भारताने दिली १ कोटी लोकांना कोरोना लस
भारताने कोरोना लसीकरणाच्या मोहिमेत आतापर्यंत १ कोटीपेक्षा जास्त लोकांना ही लस दिली आहे. या मोहिमेमध्ये एकूण ३० कोटी लोकांना ही लस देण्याचे उद्दिष्ट भारताने डोळ्यांसमोर ठेवले. अमेरिकेने ३१ दिवसांत १ कोटी नागरिकांना कोरोना लस दिली होती. हेच उद्दिष्ट भारताने ३४ दिवसांत पूर्ण केले.
देशात शुक्रवारी बळींची संख्या १०० पेक्षा कमी
- देशात शुक्रवारी कोरोना बळींची संख्या १०० पेक्षा कमी होती तसेच मृत्यूदरातही घट झाली आहे. या आजारातून आतापर्यंत १ कोटी ६ लाख ६७ हजार जण बरे झाले असून, त्यांचे प्रमाण ९७.३० टक्के आहे. उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण अवघे १.२७ टक्के होते.
- केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी कोरोनाचे १३१९३ नवे रुग्ण आढळले. तब्बल १९ दिवसांनी हा आकडा १३ हजारांपेक्षा अधिक झाला आहे. देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या १०९६३३९४ झाली आहे.
- शुक्रवारी कोरोनामुळे ९७ जण मरण पावले असून बळींची एकूण संख्या १५६१११ झाली आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरात घट होऊन तो १.४२ टक्के झाला आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या १३९५४२ आहे.
- जगात कोरोना रुग्णांची संख्या ११ कोटी ८ लाखांवर पोहोचली असून त्यातील ८ कोटी ५८ लाख लोक बरे झाले व २ कोटी २६ लाख जणांवर उपचार सुरू आहेत. अमेरिकेमध्ये २ कोटी ८५ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून १.८७ कोटी बरे झाले.