कुलभूषण जाधवप्रकरणी पाकवर दबाव आणण्यासाठी भारताची "व्हिसा"नीती

By admin | Published: April 14, 2017 12:00 PM2017-04-14T12:00:24+5:302017-04-14T12:00:24+5:30

भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावणा-या पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी देशाकडून "व्हिसा"नीती आखली जात आहे.

India's "Visa" policy to put pressure on Kulbhushan Jadhav in Pakistan | कुलभूषण जाधवप्रकरणी पाकवर दबाव आणण्यासाठी भारताची "व्हिसा"नीती

कुलभूषण जाधवप्रकरणी पाकवर दबाव आणण्यासाठी भारताची "व्हिसा"नीती

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 14 - भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावणा-या पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी देशाकडून "व्हिसा"नीती आखली जात आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील नागरिकांना भारतात येण्यासाठी व्हिसा देण्याच्या प्रक्रियेत काटेकोरपणा आणण्याची रणनीती देशाकडून आखली जात आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कलाकार, गायक आणि अभिनेत्यांना व्हिसा देण्याची प्रक्रिया धीम्या गतीनं करावी जेणेकरुन पाकिस्तानवर दबाव निर्माण होईल, असे तेथील भारतीय दूतावासातील अधिका-यांना सांगण्यात आले आहे. 
 
दरम्यान, कुलभूषण जाधव गुप्तहेर नाहीत, पाकिस्तानाकडून त्यांचं अपहरण करण्यात आलं आहे, असे भारताकडून वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र पाकिस्तान आपल्या भूमिकेवर अडून आहे. तर दुसरीकडे सूत्रांकडून अशीही माहिती मिळत आहे की, परराष्ट्र मंत्रालय पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देण्यासाठी बंदी घालण्याच्या विचारात होते. मात्र सुरुवातीला चर्चेत असलेल्या नावांवर या रणनीतीची चाचणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. 
 
पाकिस्तानातील भारतीय दूतावासाला पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देण्याच्या प्रक्रियेत घाई करू नका, असे सांगण्यात आले आहे.  याचा फटका विद्यार्थी तसंच रुग्णांना बसण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकारकडून पूर्णपणे हा निर्णय लागू करण्यात अडचणी येत आहेत. 
 
परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुलभूषण जाधव यांची सुखरुप सुटका करण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्व पर्यायांवर विचार करण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय दूतावासाने जाधव यांच्या संदर्भात केलेले 13 अर्ज पाकिस्ताननं फेटाळून लावलेत.  
 
भारताला माहिती नाही
कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानात कोठे ठेवण्यात आले आहे आणि त्यांची प्रकृती कशी आहे, याबाबत भारत सरकारला कोणतीही माहिती नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने गुरुवारी सांगण्यात आले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बागले म्हणाले की, कुलभूषण जाधव निर्दोष आहेत आणि त्यांची सुटका पाकिस्तान सरकारने करावी, अशी भारतातील प्रत्येक व्यक्तीची भावना आहे आणि परराष्ट्र मंत्रालयालाही तसेच वाटत आहे. त्यामुळे त्याच्या सुटकेसाठी भारत सरकार प्रयत्न करीत आहे. कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी कोणत्याही टोकाला जाऊ , असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पुन्हा स्पष्ट केले.
 
(कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर संयुक्त राष्ट्र गप्पच)
भारत आणि पाकिस्तानने आपापसातील प्रश्न शांततामय मार्गांनी सोडवण्यासाठी चर्चा करावी, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले. भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेबद्दल भाष्य करण्यास संयुक्त राष्ट्रांचे (युनो) सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेझ यांनी नकार दिला.
 
या एका विशिष्ट घटनेवर (कुलभूषण जाधव) भाष्य करण्याच्या अवस्थेत आम्ही नाहीत, असे गुटेरेझ यांचे प्रवक्ते स्टीफन दुतारीक यांनी बुधवारी येथे म्हटले. 
 
 
कोण आहेत कुलभूषण जाधव?
कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलाचे कमांडर दर्जाचे माजी अधिकारी आहेत. ते भारताच्या रीसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस विंग’ (रॉ) या गुप्तहेर संस्थेसाठी पाकिस्तानात हेरगिरी आणि विघातक कृत्यांची तयारी करत असताना पकडले गेले होते, असा पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, जाधव यांना गेल्या वर्षी ३ मार्च रोजी बलुचिस्तानात मश्केल येथे अटक केली होती. त्या वेळी त्यांच्याकडे सापडलेल्या पासपोर्टवर त्यांचे नाव हुसेन मुबारक पटेल असे दाखवले होते. त्यावर ते सांगलीचे रहिवासी असून, ठाणे कार्यालयाने त्यांना 12  मे 2014 रोजी त्यांना पासपोर्ट दिल्याचा उल्लेखही आहे. पाकिस्तानने या आरोपाच्या समर्थनार्थ त्याच्या पासपोर्टची प्रतही प्रसिद्ध केली आहे.
 
पाकिस्तानच्या सुरक्षा दलांच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख मेजर जनरल आसिफ गफूर यांनी सोमवारी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, कुलभूषण जाधववर पाकिस्तानच्या लष्करी कायद्यानुसार कोर्ट मार्शल चालवण्यात आले आणि त्यात दोषी ठरल्यामुळे फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमाल जावेद बाजवा यांनी या शिक्षेवर सोमवारी शिक्कामोर्तब केले, असेही त्यात नमूद करण्यात आले.

Web Title: India's "Visa" policy to put pressure on Kulbhushan Jadhav in Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.