पडून असलेल्या साठ्यांमुळे भारताची गहू आयात थंडावली
By admin | Published: May 18, 2017 06:19 AM2017-05-18T06:19:01+5:302017-05-18T06:19:01+5:30
यंदा देशांतर्गत गव्हाचे प्रचंड उत्पादन झाले आहे, तसेच या आधी आयात केलेल्या गव्हाचे प्रचंड साठे देशाच्या विविध बंदरांवर पडून आहेत. त्यामुळे यंदा भारताची
- लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : यंदा देशांतर्गत गव्हाचे प्रचंड उत्पादन झाले आहे, तसेच या आधी आयात केलेल्या गव्हाचे प्रचंड साठे देशाच्या विविध बंदरांवर पडून आहेत. त्यामुळे यंदा भारताची गहू आयात थंडावली आहे.
वाणिज्य आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, बंदरावरील गव्हाचे साठे १.८ दशलक्ष टनांवर गेले आहेत. हा एक उच्चांकच आहे. बंदरावर पडून असलेल्या गव्हात प्रामुख्याने आॅस्ट्रेलिया आणि काळ््या समुद्राच्या परिसरातून आयात केलेला गहू आहे.
एका व्यापाऱ्याने सांगितले की, आटा मिलवाले यंदा आयात केलेला गहू उचलायला तयार नाहीत. त्याऐवजी ते स्थानिक गव्हाला प्राधान्य देत आहेत. एक तर यंदा देशांतर्गत गव्हाचे उत्पादन प्रचंड झाले आहे, तसेच स्थानिक गव्हाची गुणवत्ताही चांगली आहे. गव्हाला चांगली मागणी राहील, असा अंदाज बांधून गव्हाची आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी आता ही बाब डोकेदुखीची ठरली आहे. भारताच्या विविध बंदरांवर गव्हाचे साठे पडून आहेत.
यंदा गव्हाचे पीक सगळीकडेच चांगले आले आहे. त्यामुळे किमती उतरल्या आहेत.
त्याचा फटका कृषी उत्पादनाच्या व्यवसायात असलेल्या बड्या कंपन्यांना बसत आहे. त्यात कारगील, बुंगे लिमिटेड, आर्कर डॅनिएल्स मिडलँड आणि लुइस ड्रेफस आदींचा समावेश आहे.
अमेरिकी सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जागतिक पातळीवर मका, गहू आणि सोयाबीन यांच्या साठ्यात सलग चौथ्या वर्षी वाढ झाली आहे. १९९0 दशकातील उत्तरार्धानंतरची ही सर्वाधिक दीर्घकालीन
वाढ ठरली आहे. भारतात मात्र, गेल्या दोन वर्षांत गव्हाच्या पुरवठ्यात घसरण झाली होती. त्यामुळे आयात वाढली होती. यंदा परिस्थितीत सुधारणा झाल्यामुळे सरकारने आयातीवर १0 टक्के शुल्क लावले आहे.
- पाऊस चांगला झाल्याने २०१६-१७ या काळात गव्हाचे उत्पादन ५.६ टक्के वाढून ९७.४ दशलक्ष टन एवढे आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर गेले आहे.
- बंदरावरील गव्हाचे साठे १.८ दशलक्ष टनांवर गेले आहेत. हा एक उच्चांकच आहे.