किमान सहा केंद्रीय मंत्र्यांना संघटनेत पाठविण्याचे संकेत;८ ते १२ जुलै दरम्यान मंत्रिमंडळ फेरबदल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 06:22 AM2023-07-06T06:22:17+5:302023-07-06T06:23:20+5:30
यात वित्तमंत्री निर्मला सीतारामन, आरोग्यमंत्री मनसुखभाई मांडविया, प्रल्हादसिंह पटेल, मुरलीधरन व ज्योतिरादित्य शिंदे यांची नावे आहेत.
- संजय शर्मा
नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी होणाऱ्या केंद्रातील मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी अंतिम टप्प्यात आहे. सूत्रांनी सांगितले की, ८ ते १२ जुलै दरम्यान कधीही फेरबदल होऊ शकतो. सरकारमधील किमान सहा मंत्र्यांना भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बोलावून संघटनेत काम करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यात वित्तमंत्री निर्मला सीतारामन, आरोग्यमंत्री मनसुखभाई मांडविया, प्रल्हादसिंह पटेल, मुरलीधरन व ज्योतिरादित्य शिंदे यांची नावे आहेत.
भाजप अध्यक्षांचे बैठकांचे सत्र
मंगळवारी निर्मला सीतारामन यांनी नड्डा यांची भेट घेतली होती. बुधवारी सकाळी मांडविया यांना नड्डा यांनी निवासस्थानी बोलावले. प्रल्हादसिंह पटेल यांना दुपारी भाजप मुख्यालयात बोलावले. सायंकाळी शिंदे यांना बोलावले. केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांना मंगळवारीच तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष नियुक्त केले. केरळमध्ये भाजप मोठा बदल करताना दिसत आहे. केंद्रीय विदेश राज्यमंत्री मुरलीधरन यांना भाजप प्रदेशाध्यक्ष केले जाण्याची शक्यता आहे.
सी. आर. पाटील यांना सरचिटणीसपद?
सूत्रांनी सांगितले की, सीतारामन यांना काही राज्यांचे प्रभारी केले जाऊ शकते. मांडविया यांच्याकडे गुजरात भाजपची सूत्रे जाऊ शकतात. गुजरात भाजपचे अध्यक्ष सी. आर. पाटील यांना गुजरातमधील विजयाचे बक्षीस दिले जाणार आहे. त्यांना भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस करून उत्तर प्रदेशचे प्रभारी तसेच केंद्रीय मंत्री करण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशात नोव्हेंबरमधील विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल व ज्योतिरादित्य शिंदे यांचीही नड्डा यांच्याशी चर्चा झाली आहे.
अकाली दल व भाजपच्या युतीची लवकरच घोषणा
पंजाबचे नवनियुक्त भाजप प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी बुधवारी जे. पी. नड्डा यांची भेट घेतल्यानंतर पंजाबमध्ये लवकरच शिरोमणी अकाली दल व भाजपच्या युतीची घोषणा होण्याचे संकेत दिले. आगामी काही दिवसांत मोदी मंत्रिमंडळात अकाली दलाच्या एका नेत्याला सामावून घेतले जाऊ शकते. माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल पुन्हा एकदा मंत्रिमंडळात सहभागी होण्याची शक्यता आहे. पंजाबमधील राज्यमंत्री झालेले सोम प्रकाश यांना हटवले जाण्याची शक्यता आहे.