चार देशांतील नागरिकांना १८ विशेष विमानांतून धाडणार मायदेशी; कोरोनामुळे अडकले भारतात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 02:12 AM2020-04-04T02:12:02+5:302020-04-04T06:29:46+5:30
टाळेबंदीमुळे अडचणींमध्ये वाढ
नवी दिल्ली : कोरोनाची साथ व त्यामुळे पुकारलेल्या टाळेबंदीमुळे भारतात अडकून पडलेल्या जर्मनी, फ्रान्स, आयर्लंड, कॅनडा या देशाच्या नागरिकांना एअर इंडियाच्या १८ विशेष विमानांतून त्यांच्या मायदेशी पाठविण्यात येणार आहे. त्यातील फ्रान्स, जर्मनीच्या नागरिकांना अनुक्रमे पॅरिस, फ्रँकफर्ट येथे नेण्यात येईल. तर आयर्लंड, कॅनडाच्या नागरिकांना भारतातून लंडन येथील हिथ्रो विमानतळावर नेऊन त्या देशांतर्फे नागरिकांच्यापुढील प्रवासाची सोय करण्यात येईल.
एअर इंडियाचे अध्यक्ष राजीव बन्सल यांनी सांगितले की, भारतात अडकलेल्या विदेशी नागरिकांना परत पाठविण्याकरिता त्यांच्या देशांनी भारतातील राजदूतावासामार्फत एअर इंडियाशी संपर्क साधला होता. जर्मनी, कॅनडाला एअर इंडियाची प्रत्येकी सहा तर फ्रान्स, आयर्लंडच्या दिशेने प्रत्येकी एक विशेषविमान रवाना होईल. त्या देशांतून भारतात परत येताना या विशेष विमानांतून एकही प्रवासी आणला जाणार नाही किंवा मालवाहतूक करण्यात येणार नाही.
ते म्हणाले की, या विशेष विमानांतून विदेशी नागरिकांना त्यांच्या मायदेशी पोहोचविण्याचे काम बुधवारपासून सुरू झाले. चीनमधून वैद्यकीय उपकरणे हवाईमार्गे आणण्यासाठी त्या देशाने भारताला परवानगी दिली आहे. त्यानुसार दिल्लीहून उद्या, ४ एप्रिल व ५ एप्रिल रोजी मालवाहतूक करणारी विमाने शांघायला जातील. त्याचबरोबर ६ ते ९ एप्रिल दरम्यानही दिल्लीहून मालवाहतूक करणारी विमाने शांघायला नेण्यासाठी चीनच्या परवानगीची आम्ही प्रतीक्षा करत आहोत. त्यातून वैद्यकीय उपकरणे तसेच अन्य वैद्यकीय साहित्य आणण्यात येईल. (वृत्तसंस्था)
कोरोना साथीच्या मुकाबल्यासाठी २६ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत भारतामध्ये ८५ विमानांतून ७६ टन वजन भरेल इतकी वैद्यकीय उपकरणे व वस्तूंची देशांतर्गत ने-आण करण्यात आली. त्यासाठी एअर इंडियाच्या ६२, भारतीय हवाई दलाच्या १५ व खासगी मालकीच्या ८ विमानांचा वापर करण्यात आला.
भारतीय हवाई दलाचे एक विमान भाजीपाला घेऊन दिल्लीजवळील हिंदोन तळावरून गुरुवारी सकाळी लेहला गेले होते. कोरोनाविरोधातील लढ्यासाठी प्रवासी विमानांना मालवाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली असून अशा विमानांची संख्या वाढविण्यात येईल. वैद्यकीय मदत मोफत व अन्य वस्तू योग्य दर आकारून या विमानांतून नेण्यात येतील, असे नागरी हवाई वाहतूक खात्याच्या सूत्रांनी सांगितले.