स्वयंपूर्णतेसाठी स्वदेशी संरक्षण उत्पादन गरजेचे
By admin | Published: January 4, 2016 02:55 AM2016-01-04T02:55:20+5:302016-01-04T02:55:20+5:30
संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी भारतास स्वदेशी संरक्षण उत्पादनावर भर द्यावा लागेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.
नवी दिल्ली : संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी भारतास स्वदेशी संरक्षण उत्पादनावर भर द्यावा लागेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. देशातील शास्त्रज्ञ व अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्वदेशी संरक्षण उत्पादनास चालना देत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कर्नाटकच्या तुमाकुरू जिल्ह्यातील बीदरहल्ला कवान येथे ५,००० कोटी रुपयांच्या ग्रीनफील्ड हेलिकॉप्टर प्रकल्पाच्या शिलान्यास कार्यक्रमात ते बोलत होते. भारतीय सशस्त्र दल देशासाठी कुठलेही बलिदान देण्यास तयार आहे. डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण करणाऱ्या या जवानांना जगातील सर्वश्रेष्ठ व अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पुरविण्याची गरज आहे. आता आपण आपल्या जवानांसाठी विदेशातून शस्त्रास्त्रे आयात करतो. भारत यावर कोट्यवधी रुपये खर्च करतो. याउपरही अपेक्षित अत्याधुनिक तंत्रज्ञान आपल्याला मिळत नाही. ही स्थिती बदलायची असेल तर भारतालाच या क्षेत्रात स्वयंपूर्ण व्हावे लागेल, असे ते म्हणाले.
केंद्र व राज्यांच्या संस्थांमध्ये शास्त्रीय समन्वय वाढविण्याच्या दिशेने सरकारचे काम सुरू आहे. माझ्या व माझ्या सरकारसाठी सुशासनाचा अर्थ केवळ धोरण वा निर्णय घेणे आणि त्यात पारदर्शकता वा उत्तरदायित्व आणणे, एवढाच नाही, तर आमच्या ध्येयधोरणांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान सामील करणे हाही आहे, असे सांगत शहरांची दशा आणि दिशा सुधारण्यासाठी तुम्हाला अत्याधुनिक शास्त्रीय उपकरणे बनवावी लागतील. शहरांच्या विकासासोबतच अनेक आव्हानेही निर्माण झाली आहेत. अशा स्थितीत तुमच्यावरील जबाबदारी वाढली आहे.
केवळ हवामान बदलाच्या समस्येशी लढणेच नाही, तर या हवामान बदलासोबत न्याय करण्याचीही गरज आहे. निसर्ग आणि परिसंस्थेची काळजी घेत, आपल्याला अधिक संवेदनशीलपणे योजना बनवून अत्याधुनिक शास्त्रीय मार्गाने शहरांचा विकास साधायचा आहे, असे शास्त्रज्ञ व संशोधकांना उद्देशून ते म्हणाले.