विमान टेकऑफ होणार इतक्यात प्रवासी म्हणाला 'मी कोरोना पॉझिटिव्ह', संपूर्ण विमान झालं रिकामी!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2021 07:40 PM2021-03-05T19:40:41+5:302021-03-05T19:41:57+5:30
Corona Virus: दिल्लीहून पुण्यासाठी येणाऱ्या विमानात एक अजब प्रकार घडला आणि दिल्ली विमानतळावर एकच खळबळ उडाली.
कोरोना काळात प्रतिबंधक नियमांचं पालन करताना खास करुन प्रवासावेळी प्रत्येकजण काळजी बाळगण्याचा प्रयत्न करतो. यात विमान प्रवासावेळी जास्त काळजी घ्यावी लागत आहे. पण दिल्लीहून पुण्यासाठी येणाऱ्या विमानात एक अजब प्रकार घडला आणि दिल्ली विमानतळावर एकच खळबळ उडाली.
दिल्लीहून पुण्यासाठी विमान उड्डाण घेण्यासाठी सज्ज असतानाच एका प्रवाशानं आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलं. त्यानंतर संपूर्ण विमान अवघ्या काही मिनिटांत रिकामी करण्यात आलं.
नेमकं काय घडलं?
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो कंपनीचं ६ई २८६ क्रमांकाचे विमान पुण्यासाठी उड्डाण घेणार होते. पण विमानाचं उड्डाण होण्याच्या काही मिनिटांआधीच एका प्रवाशानं कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं विमानातील व्यवस्थापना कळवलं. त्यानंतर तातडीनं विमान रिकामी करण्यात आलं.
विमान टेक ऑफ करण्याआधीच हाती आला रिपोर्ट
कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलेल्या प्रवाशाला महाराष्ट्रात यायचं होतं. त्याआधी दिल्ली विमानतळावर त्यानं आरटी-पीआरसी चाचणी केली होती आणि अहवालाच्या प्रतिक्षेत तो होता. पण नेमकं विमान टेकऑफ करण्यासाठी काही मिनिटांचा अवधी शिल्लक असताना त्याला चाचणीचा अहवाल प्राप्त झाला. प्रवाशानं तातडीनं जबाबदार नागरिकाप्रमाणं 'केब्रिन क्रू'ला कोरोनाची माहिती दिली. त्यानंतर पायलटला सूचना देण्यात आळी आणि विमान 'पार्किंग बे'मध्ये नेण्यात आले.
कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या प्रवाशाला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली गेली आणि विमान देखील पूर्णपणे सॅनिटाइज करण्यात आलं. या घटनेमुळे विमानतळावरील वाहतूक काहीकाळ बंद होती.