नियोजित वेळेच्या 25 मिनिटं आधी इंडिगोच्या विमानाने केलं टेक ऑफ, 14 प्रवासी राहिले एअरपोर्टवरच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 10:15 AM2018-01-16T10:15:39+5:302018-01-16T10:28:44+5:30
गोव्याहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाने नियोजित वेळेच्या आधी टेक ऑफ केल्याचा प्रकार समोर आला आहे.
मुंबई - गोव्याहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाने नियोजित वेळेच्या आधी टेक ऑफ केल्याचा प्रकार समोर आला आहे. वेळेच्या आधी टेक ऑफ केल्याने त्या विमान प्रवासाचं तिकिट काढलेल्या 14 प्रवाशांना प्रवास करता आला नाही. दरम्यान, प्रवाशांनी केलेल्या या दाव्याला इंडिगोच्या प्रवक्त्यांनी नकार दिला आहे.
सोमवारी ही घटना घडली आहे. एका प्रवाशाच्या माहितीनुसार, इंडिगोचं विमान नियोजित वेळेच्या आधी रवाना झालं. एअरपोर्टवर यासंदर्भातील कुठलीही अनाऊन्समेंट करण्यात आली नाही. पण प्रवाशाने केलेला हा दावा इंडिगोच्या प्रवक्त्यांनी खोडून काढला आहे. प्रवाशांना गेटवर रिपोर्ट करण्यासाठी अनेक वेळा अनाऊन्समेंट करण्यात आली, पण हे प्रवासी वेळेवल आले नाहीत, असं इंडिगोच्या प्रवक्त्यांनी म्हंटलं आहे.
इंडिगोचं 6E 259 हे विमान सोमवारी रात्री 10 वाजून 50 मिनिटांनी रवाना होणार होतं. पण प्रवाशांच्या माहितीनुसार, या विमानाने 25 मिनिटं आधी टेक ऑफ झालं. इंडिगोचं हे विमान रात्री 12 वाजून 5 मिनिटांनी हैदराबादला पोहचणार होतं पण ते 11 वाजून 40 मिनिटांनी हैदराबादला पोहचलं.
याप्रकरणी इंडिगो एअरलाइन्सने स्पष्टीकरण दिलंय. बोर्डिंग गेट 10.25 वाजता बंद करण्यात आला. प्रवास करता न आलेले प्रवासी 10.33 वाजता गेटवर पोहचले. विमानाच्या टेक ऑफ आधी अनेक वेळा अनाऊन्समेंट करण्यात आली होती, असं इंडिगोने म्हंटलं आहे.
कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना फोन करण्याचा प्रयत्न केला. विमानाच्या संदर्भातील माहिती त्यांनी त्या चौदा प्रवाशांच्या ट्रॅव्हल एजंटपर्यंत पोहचवली. ट्रॅव्हल एजटंनी प्रवाशांचा फोन नंबर द्यायला नकार दिला तसंच प्रवाशांना याबद्दल सांगितलं जाईल, असंही त्यांनी म्हंटलं. एअरपोर्टवर त्या प्रवाशांना शोधण्यासाठी इंडिगो एअरलाइन्सने केलेले प्रयत्न इतर सहप्रवाशांनी पाहिले आहेत, असं स्पष्टीकरण इंडिगोच्या प्रवक्त्यांनी दिलं आहे. आमची कुठलीही चुकी नसताना त्या चौदा प्रवशांची व्यवस्था आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळच्या विमानात केली आहे, त्यासाठी पैसेही आकारले नाहीत, असं इंडिगोने म्हंटलं आहे.