विमान कर्मचारी मालवाहू कप्प्यात झोपला आणि थेट दुबईत पोहोचला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 12:40 PM2021-12-15T12:40:22+5:302021-12-15T12:40:22+5:30
मुंबई विमानतळावरील प्रकार; टेक-ऑफ घेताच आली जाग.
मुंबई : दुपारी जेवणाच्या सुटीनंतर वा काम करायचा कंटाळा आला की बसल्या जागी छोटीशी डुलकी काढायची भारतीयांची फार जुनी सवय. मुंबई विमानतळावर रात्रपाळीसाठी तैनात असलेला एक कर्मचारी अशीच डुलकी काढण्याच्या नादात गाढ झोपी गेला आणि थेट दुबईला पोहोचल्याची घटना उघडकीस आली आहे.
इंडिगो एअरलाइन्ससाठी लोडर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासोबत रविवारी हा प्रकार घडला. ६ई- १८३५ हे विमान मुंबई ते अबूधाबी मार्गावर नियोजित होते. प्रवाशांचे बॅगेज आणि अन्य साहित्य चढवून झाल्यानंतर या कर्मचाऱ्याला फारसे काम नव्हते. विमान उड्डाणास अवकाश असल्याने त्याने मालवाहू कप्प्यातच डुलकी काढायचे ठरवले. सामानाच्या मागच्या बाजूला त्याने पुठ्ठा अंथरला व ताणून दिली. विमानतळाच्या उघड्याशार पठारावर जाणवणारी कडाक्याची थंडी त्या कप्प्याने दूर सारली आणि उबदार वातावरण तयार झाल्याने हा गाढ झोपी गेला.
पहाटे २.५९ वाजता विमानाने टेक-ऑफ घेताच कंपने जाणवल्याने पठ्ठ्याला जाग आली. तेव्हा मालवाहू कप्प्याचे दार बंद आणि आत हा एकटाच. शांत बसून राहण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता. दोन तासांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर विमान अबूधाबी विमानतळावर उतरले आणि त्याच्या जीवात जीव आला. स्थानिक कर्मचाऱ्यांनी कार्गो होल्डचे दार उघडल्यानंतर तेही दचकले. त्यांनी तात्काळ सुरक्षा यंत्रणांना पाचारण केले. वैद्यकीय तपासणीअंती त्याला कोणतीही इजा झाली नसल्याचे समोर आले. त्यानंतर चौकशीला सुरुवात करण्यात आली.
असा झाला परतीचा प्रवास
वैद्यकीय तपासणीनंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली. सर्व बाबींची पुष्टी केल्यानंतर त्याच्या परतीचा मार्ग मोकळा झाला. ज्या विमानाने तो दुबईत पोहोचला होता, त्या विमानाच्या परतीच्या फेरीने त्याला मुंबईला पाठविण्यात आले. पण मालवाहू कप्प्यातून नव्हे, प्रवासी म्हणून. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरू असून, हवाई वाहतूक महासंचालनालयाने या कर्मचाऱ्याला डी-रोस्टर केल्याची माहिती इंडिगोतर्फे देण्यात आली.