डास असल्याची तक्रार केल्यानं इंडिगोनं प्रवाशाला उतरवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 11:52 AM2018-04-10T11:52:42+5:302018-04-10T11:52:42+5:30
प्रवाशाने गैरवर्तन केल्याचे इंडिगोचे स्पष्टीकरण
विमानात डास असल्याची तक्रार केल्यामुळे प्रवाशाला उतरवण्यात आल्याचा प्रकार लखनऊ विमानतळावर घडला आहे. बंगळुरुचे डॉ. सौरभ राय सोमवारी सकाळी लखनऊतील विमानतळावरुन प्रवासासाठी निघाले होते. इंडिगोच्या विमानात पोहोचल्यानंतर राय यांनी मोठ्या प्रमाणात डास असल्याची तक्रार केली. या तक्रारीमुळे आपल्याला विमानातून उतरवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तर राय यांनी धमकी दिल्याने आणि हायजॅक हा शब्द वापरल्याने सुरक्षेच्या नियमांनुसार कारवाई केल्याचे स्पष्टीकरण इंडिगोने दिले.
डॉ. राय सोमवारी सकाळी ६ वाजता इंडिगोच्या विमानात चढले. यानंतर काही वेळातच त्यांनी विमानात मोठ्या प्रमाणात डास असल्याची तक्रार केली. मात्र विमानातील कर्मचाऱ्यांनी त्यांना शांत बसण्यास सांगितले. यामुळे राय यांचा विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी वाद झाला. कर्मचाऱ्यांनी राय यांना विमानातून उतरण्यास सांगितले. एका महिन्याआधीही इंडिगोचे कर्मचारी वादात सापडले होते. नवी दिल्ली विमानतळावर कर्मचाऱ्याने प्रवाशाला धक्काबुक्की केल्याने इंडिगोवर टीका झाली होती.
The Indigo flight from Lucknow to Bengaluru was full of mosquitoes, when I raised objection, I was manhandled by the crew and offloaded from the aircraft, I was even threatened: Dr.Saurabh Rai,Passenger pic.twitter.com/00XKxuIAUP
— ANI (@ANI) April 10, 2018
डॉ. सौरभ राय यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. 'त्यांनी (कर्मचाऱ्यांनी) मला दहशतवादी म्हटले. माझ्यामुळे इतर प्रवाशांना धोका असल्याचेही ते म्हणाले,' असे राय यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी इंडिगोने प्रसिद्धीपत्रक जारी करत स्पष्टीकरण दिले आहे. 'लखनऊहून बंगळुरुला जात असलेल्या सौरभ राय यांनी गैरवर्तन केले. राय यांनी विमानात डास असल्याची तक्रार केली होती. मात्र कर्मचाऱ्यांनी त्यांची समस्या सोडवण्याआधीच राय यांनी धमकी देण्यास सुरुवात केली,' असे इंडिगोने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.