इंडिगोने दिव्यांग मुलाला विमानात चढण्यापासून रोखले, ज्योतिरादित्य सिंधिया यांनी घेतली गंभीर दखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 03:51 PM2022-05-09T15:51:57+5:302022-05-09T15:52:06+5:30
इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी 7 मे रोजी रांची विमानतळावर एका दिव्यांग मुलाला विमानात तढण्यापासून रोखले होते. त्याची ज्योतिरादित्य सिंधिया यांनी गंभीर दखल घेतली असून, ते स्वतः या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.
नवी दिल्ली: इंडिगो एअरलाइनने दिव्यांग मुलाला विमानात बसण्यास नकार दिल्याच्या घटनेची केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी गंभीर दखल घेतली आहे. ते स्वतः या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. कोणत्याही विमान कंपनीकडून प्रवाशांशी अशी वागणूक अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असे त्यांनी सोमवारी सकाळी स्पष्ट केले.
इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी 7 मे रोजी रांची विमानतळावर एका दिव्यांग मुलाला विमानात चढण्यापासून रोखल्याचा आरोप आहे. मुलगा त्याच्या आई-वडिलांसोबत होता. या कुटुंबाला हैदराबादला जायचं होते. कंपनीने दिव्यांग मुलाला विमानात चढण्यापासून रोखल्यानंतर त्याच्या पालकांनाही विमानात बसता आले नाही. इंडिगोने याचे कारण सांगितले की, मूल विमानात प्रवास करताना घाबरले होते. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे प्रमुख अरुण कुमार यांनी सोमवारी पीटीआयला सांगितले की, विमान वाहतूक नियामकाने याप्रकरणी इंडिगोकडून अहवाल मागवला आहे. त्यांनी सांगितले की डीजीसीए या घटनेची चौकशी करुन योग्य ती कारवाई करेल.
मनीषा गुप्ता नावाच्या प्रवाशाने लिंक्डइनवर या घटनेबद्दल लिहिले
मनीषा गुप्ता नावाच्या प्रवाशाने लिंक्डइनवर या घटनेची सविस्तर माहिती दिली आहे. त्या म्हणाले की, शनिवारी रांची विमानतळावर एका दिव्यांग तरुणाची गैरसोय झाली. विमानतळापर्यंतच्या प्रवासातून आलेला थकवा, सुरक्षा तपासणीचा ताण आणि भुकेने अस्वस्थ झाल्यामुळे तो गोंधळला. पण, त्याच्या पालकांनी त्याला शांत केले. विमानात बसण्यापूर्वी मुलाला खाऊ घालून औषधे देण्यात आली. पण, नंतर इंडिगोच्या कर्मचार्यांनी मुलाला विमानात चढू दिले जाणार नाही, असे सांगितले. इतर प्रवाशांनी याला कडाडून विरोध करत मुलाला आणि त्याच्या पालकांना लवकरात लवकर विमानात बसण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली.