इंदिरा गांधी भारताच्या सर्वात 'शक्तिशाली' पंतप्रधान - सुरेश प्रभू
By admin | Published: March 23, 2016 09:02 AM2016-03-23T09:02:55+5:302016-03-23T09:19:01+5:30
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या देशातील सर्वात 'शक्तिशाली' पंतप्रधान होत्या, असे मत केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या देशातील सर्वात 'शक्तिशाली' पंतप्रधान होत्या, असे मत भाजपा नेते व केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी इंदिरा यांचे कौतुक केले. 'अमेरिकेत आत्तापर्यंत कोणतीही महिला राष्ट्रपती बनू शकली नाही, भारतात मात्र राष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्ष ही तिनही प्रमुख पदं महिलांनी भूषवली' असे नमूद करत ' इंदिरा गांधी या देशातील सर्वात शक्तिशाली पंतप्रधान होत्या' याचा पुनरुच्चार प्रभू यांनी केला.
'जगभरात अशा अनेक महिला आहेत ज्यांनी आपल्या उत्तम कामगिरीने, कर्तृत्वाने पुरूषांसमोर मोठ आव्हान उभं केलं आहे. भारतातील महिलांनी तर आपल्या कौशल्याने एक संस्कृतीच उभारली आहे. रेल्वेतही मोठ्या संख्येने महिला कर्मचारी असून त्या उत्तम रितीने काम करतात. महिला किठेही असोत, त्या जिथे जातील तिथे उत्तमच काम करतात. भारतीय रेल्वेमध्ये १३ लाख कर्मचारी आहेत, त्यापैकी महिलांची संख्या सुमारे १ लाख आहे,' अशा शब्दांत प्रभू यांनी महिलांचे कौतुक केले.
दरम्यान यावेळी त्यांनी रेल्वेतील महिलांना पुरूषांसाठीही आदर्श ठरेल असे काम करण्याचे आवाहन केले. तसेच महिला दिवस फक्त एका दिवसासाठी नसावा असे सांगत नवे संकल्प करून पुढे वाटचाल करावी असेही प्रभू म्हणाले.