स्मृतिपटलावर कोरल्या गेलेल्या इंदिरा गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 03:48 AM2017-11-19T03:48:29+5:302017-11-19T07:18:02+5:30
इंदिरा गांधी यांचे नेतृत्व किती कठोर होते याचा एक प्रसंग मुद्दाम सांगावासा वाटतो. १९७२ च्या विधानसभा निवडणुकांसाठी पक्षांतर्गत लोकशाही प्रक्रियेला गुंडाळून ठेवत सगळ्या उमेदवारांना त्यांनी दिल्लीत बोलावले.
- दिनकर रायकर
(समूह संपादक, लोकमत)
इंदिरा गांधी यांच्या दौ-यातील, पत्रकार परिषदांतील स्मृतींचा काही अंश...
इंदिरा गांधी यांचे नेतृत्व किती कठोर होते याचा एक प्रसंग मुद्दाम सांगावासा वाटतो. १९७२ च्या विधानसभा निवडणुकांसाठी पक्षांतर्गत लोकशाही प्रक्रियेला गुंडाळून ठेवत सगळ्या उमेदवारांना त्यांनी दिल्लीत बोलावले. सगळ्यांना रांगा लावून मुलाखती द्याव्या लागल्या़ यातून मंत्रीही सुटले नाहीत. परीक्षेत जे पास झाले त्यांना तिकिटे दिली गेली आणि त्या निवडणुकीत काँग्रेसला अभूतपूर्व यश मिळाले.
१९७८ च्या विधानसभा निवडणुकीचा काळ होता. निवडणूक प्रचारासाठी काँग्रेस आयच्या अध्यक्षा इंदिरा गांधी महाराष्टÑ दौºयावर आल्या होत्या. मुंबईत पत्रकार परिषद झाली. प्रदेशाध्यक्ष नाशिकराव तिरपुडे आणि ज्येष्ठ नेते रामराव आदिक त्यांच्यासोबत होते. पत्रकार परिषदेनंतर त्यांचा मुंबई ते कोल्हापूर रोड शो होता. प्रचारसभाही होत्या. त्यांच्या गाडीच्या ताफ्यात आम्हा पत्रकारांची गाडी होती़ त्यात मी, पीटीआयचे टी.एन. अशोक आणि यूएनआयचे दीपक नियोगी होतो. दिवसभराच्या प्रचारसभेचे वार्तांकन करत करत मध्यरात्रीच्या सुमारास आम्ही कोल्हापूरला पोहोचलो. त्यांचा मुक्काम सर्किट हाउसवर होता. आमची सोयही तेथेच होती. तिघांना मिळून एक खोली होती. दिवसभराच्या प्रवासाने थकून गेलो होतो. धुळीने अंग आणि कपडे मळलेले होते. आम्ही कपडे बदलले. केवळ बनियन आणि टॉवेल गुंडाळून आम्ही दिवसभराच्या गप्पा मारत बसलो. तेवढ्यात दारावरची कडी वाजली. एवढ्या रात्री कोण आले म्हणत टी.एन. अशोक यांनी दरवाजा उघडला आणि आम्ही सगळे अचंबित झालो. दारात साक्षात इंदिरा गांधी उभ्या होत्या. आम्ही टॉवेल सांभाळायचा की अंगावर शर्ट घालायचा या कुचंबनेत असतानाच एखाद्या आईने घरात आलेल्या मुलांची चौकशी करावी अशा आपुलकीच्या स्वरात त्या म्हणाल्या, बच्चेलोग, पुरे दिन आप हमारे साथ थे... आपने कुछ खाया की नहीं... त्यावर काय बोलावे हे सुचतच नव्हते त्यामुळे आम्ही ‘हो’ म्हणत कशीबशी सुटका करून घेतली.
हा सगळा प्रसंग आज स्व. इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अगदी काल घडल्यासारखा आठवतो. ‘केंद्रीय मंत्रिमंडळातील एकमेव पुरुष’ असा ज्यांचा उल्लेख व्हायचा, आयर्न लेडी म्हणून ज्यांचे वर्णन केले जायचे, १९७१ च्या युद्धात अमेरिकेच्या विरोधाला न जुमानता बांगलादेशची निर्मिती करणाºया इंदिरा गांधी मध्यरात्री आपल्यासोबतच्या पत्रकारांना आपुलकीने जेवलात की नाही, असे विचारत होत्या. त्यांचे ते वेगळे रूप आजही माझ्या स्मृतिपटलावर कायमचे कोरले गेले आहे.
१९७५ ते १९७७ हा आणीबाणीचा काळ होता. पत्रकारांवर, वर्तमानपत्रांवर सेन्सॉरशिप लादली गेली होती. त्यामुळे तमाम पत्रकार इंदिरा गांधी यांच्याविषयी नाराज होते. १९७७ मध्ये काँग्रेसचा पराभव झाला. त्यानंतरही पत्रकारांची ही नाराजी गेली नव्हती. त्या पार्श्वभूमीवर १९७८ मध्ये महाराष्टÑात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या होत्या. काँग्रेस दुभंगली होती. काँग्रेस आय आणि रेड्डी काँग्रेस असे एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे होते. महाराष्टÑातील दिग्गज नेते रेड्डी काँग्रेसमध्ये होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी यांचा महाराष्ट्र दौरा सुरू होता. त्यांना किती व कसा प्रतिसाद मिळतो हे पाहण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत दौºयावर होतो.
त्याआधी म्हणजे १९७२ चा आणखी एक प्रसंग माझ्या कायम स्मरणात आहे. त्या वेळी वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. संपूर्ण राज्य तीव्र दुष्काळाने होरपळून निघाले होते. राज्यात दुष्काळी कामे जास्तीत जास्त कशी निघतील व लोकांच्या हाताला काम कसे मिळेल यासाठी नाईक यांचा प्रयत्न चाललेला होता. कोकण रेल्वे प्रकल्प अनेक वर्षे रेंगाळलेला होता. तो सुरू झाला तर खूप लोकांना काम मिळेल हा हेतू नाईकांचा होता. त्या काळात ज्या ज्या वेळी इंदिरा गांधी राज्याच्या दौºयावर यायच्या, तेव्हा वसंतराव नाईक मंत्रालय कव्हर करणाºया आम्हा पत्रकारांना कोकण रेल्वे कधी सुरू करणार, असा प्रश्न इंदिरा गांधी यांना विचारा, असे सतत सांगायचे. योगायोग असा, इंदिरा गांधी मराठवाड्याच्या दुष्काळी दौºयावर असताना पैठण येथे पत्रकारांनी कोकण रेल्वेचा प्रश्न विचारला आणि त्यांनी कोकण रेल्वेचा प्रकल्प मंजूर करत आहे, अशी घोषणा तेथील जाहीर सभेत केली. त्या वेळी केंद्रीय रेल्वेमंत्री टी.ए. पै होते. त्यांचे मुंबईत घर होते. दुसºया दिवशी आम्हा पत्रकारांना घेऊन नाईक यांनी पै यांच्या मरिन ड्राइव्ह येथील घरी नेले व त्यांच्याकडून कोकण रेल्वेच्या कामाची घोषणा वदवून घेतली. त्यामुळे त्यावर सरकारी मोहर उमटली गेली. त्या वेळी विकासकामासाठी मुख्यमंत्री व केंद्रातले नेते पत्रकारांचा कसा वापर करून घेत होते हे आजच्या पिढीला कळावे म्हणून हा प्रसंग..!
एसएमआय असीर हे महाराष्टÑाचे मंत्री व प्रदेशाध्यक्ष होते. इंदिरा गांधींनी सगळ्या प्रदेशाध्यक्षांची बैठक दिल्लीत बोलावली होती. असीर समोरच्या रांगेत बसले होते. इंदिरा गांधी बोलत असताना असीर यांना केवळ झोपच लागली नाही तर ते चक्क घोरूही लागले. त्या वेळी इंदिरा गांधी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, पण बैठक संपवून असीर मुंबईला परत येईपर्यंत त्यांचे प्रदेशाध्यक्षपद गेले होते. असे निर्णय घेण्याचे धाडस त्यांच्यात होते.