इंदिरा गांधींचा पाकच्या अणुकेंद्रांवर हल्ल्याचा होता विचार
By admin | Published: August 31, 2015 11:16 PM2015-08-31T23:16:52+5:302015-09-01T09:02:54+5:30
१९८० मध्ये सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानच्या अणुभट्ट्यांवर लष्करी हल्ल्यांचा विचार केला होता. अमेरिकन गुप्तचर संघटना
वॉशिंग्टन : १९८० मध्ये सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानच्या अणुभट्ट्यांवर लष्करी हल्ल्यांचा विचार केला होता. अमेरिकन गुप्तचर संघटना सीआयएच्या एका गोपनीय दस्तावेजातून ही माहिती समोर आली आहे.
अमेरिका ‘एफ-१६’ ही लढाऊ विमाने पाकिस्तानला देण्याच्या तयारीत असताना इंदिरा गांधी यांनी हल्ल्याचा विचार केला होता, असे सीआयएच्या ८ सप्टेंबर १९८१ रोजीच्या एका अहवालात म्हटले आहे. ‘पाकमधील आण्विक घडामोडींना भारताचे प्रत्युत्तर’ असे शीर्षक असलेल्या या १२ पानी अहवालाचा संपादित भाग गेल्या जूनमध्ये सीआयएच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आला होता. त्यानुसार, अण्वस्त्र आघाडीवरील पाकच्या प्रगतीमुळे १९८१ मध्ये गांधींच्या नेतृत्वाखालील सरकार चिंताक्रांत झाले होते.
पाक अणुबॉम्बपासून केवळ काही पावलेच दूर असल्याची त्यांची खात्री झाली होती व अमेरिकेचाही तोच अंदाज होता. पुढील दोन किंवा तीन महिन्यांत भारताची चिंता आणखी वाढल्यास पाकची अणुकेंद्रे उद्ध्वस्त करण्यासाठी लष्करी हल्ल्याचा निर्णय इंदिरा गांधींनी घ्यावा अशी स्थिती निर्माण होईल, असे यात म्हटले होते.
सीआयच्या अहवालात म्हटले आहे की, पाकच्या अणुस्फोटाचा राष्ट्रीय सुरक्षेला धोका होणार नाही, असा निष्कर्ष काढून शांततापूर्ण अणुचाचणी कार्यक्रम सुरू केल्यामुळे क्षेत्रातील भारताच्या प्रतिमेचे नुकसान कमी केले जाऊ शकते, अशी भूमिका भारताने घेतल्याचे दिसते.
अहवालात म्हटले आहे की, गांधी यांनी कदाचित पाकविरुद्ध लष्करी पर्याय न वापरण्याचा निर्णय घेतला असावा. पाकला एफ १६ लढाऊ विमाने देण्यावरून भारताची चिंता वाढल्यास गांधी यांच्यासाठी संभाव्य आपत्कालीन हल्ल्याची योजना अमलात आणण्यासाठीची स्थिती उत्पन्न होईल, असे वाटते; मात्र भारत थांबा आणि वाट पाहाचे धोरण अवलंबेल, असा आमचा अंदाज आहे. (वृत्तसंस्था)