इंदिरा गांधींच्या मारेकऱ्यांना आदरांजली!!
By admin | Published: January 4, 2016 03:26 AM2016-01-04T03:26:46+5:302016-01-04T03:30:40+5:30
देशाच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांना रविवारी अकाली दल नेत्यांच्या उपस्थितीत शहीद ठरवून आदरांजली वाहण्यात आली. एवढेच नाहीतर, त्यांच्या कुटुंबीयांचाही येथे आयोजित एका
नवी दिल्ली : देशाच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांना रविवारी अकाली दल नेत्यांच्या उपस्थितीत शहीद ठरवून आदरांजली वाहण्यात आली. एवढेच नाहीतर, त्यांच्या कुटुंबीयांचाही येथे आयोजित एका समारंभात सत्कार करण्यात आला. हिंदू महासभा नथुराम गोडसेची जयंती साजरी करूशकते मग शीख समुदाय या तिघांची पुण्यतिथी का साजरी करू शकत नाही, असा युक्तिवादही अकाली दलाने आपल्या कृतीच्या समर्थनार्थ केला.
मोतीबाग गुरुद्वारात शीख स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने आयोजित समारंभात इंदिरा गांधी यांचमारेकरी केहरसिंग, सतवंतसिंग आणि बेअंतसिंग यांच्या स्मरणात ‘भोग’ आणि अखंड पाठ आयोजित करण्यात आला होता. यावेळी या मारेकऱ्यांना शीख पंथाचे शहीद असे संबोधण्यात आले. तसेच गुरुद्वाराच्या प्रमुख ग्रंथींनी केहरसिंगच्या विधवेचा ‘सिरोपा’ देऊन सन्मान केला. कार्यक्रमाला दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे माजी प्रमुख अवतारसिंग हित, धर्म प्रचार समितीचे अध्यक्ष परमजीतसिंग आणि शीख विद्यार्थी संघाचे अध्यक्ष गुरमीतसिंग उपस्थित होते. शिखांची सर्वोच्च धार्मिक संस्था अकाल तख्तने बेअंतसिंग,सतवंतसिंग आणि केहरसिंग या तिघांना यापूर्वीच शहीद घोषित केले असून आम्ही केवळ त्यांची पुण्यतिथी साजरी करीत आहोत,असे गुरमीतसिंग यांनी सांगितले.
ते गुन्हेगार अथवा दहशतवादी नाहीत. धार्मिक प्रथेनुसार आपले अंत्यसंस्कार व्हावेत हा प्रत्येक व्यक्तीचा नैसर्गिक अधिकार आहे. न्यायालयाने त्यांना भलेही मृत्युदंड दिला असेल परंतु शीख समुदाय १९८४ च्या शीखविरोधी दंगलप्रकरणी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, असे मनजीतसिंग जीके यांनी या समारंभाबाबत विचारणा केली असताना स्पष्ट केले. दिल्ली शीख गुरुद्वारा समितीने या कार्यक्रमाचे समर्थन केले असले तरी जीके तेथे उपस्थित नव्हते.
पंजाबमध्ये भाजपासोबतच्या सत्ताधारी आघाडीत शिरोमणी अकाली दल सहभागी असून राज्यात २०१७ साली तेथे विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. इंदिरा गांधींच्या मारेकऱ्यांचा सन्मान करण्यावर भाजपाने यापूर्वीच आक्षेप घेतला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)