भारत -चीन सीमा वाद का ताणला जातोय?
By admin | Published: July 12, 2017 04:14 AM2017-07-12T04:14:33+5:302017-07-12T04:14:33+5:30
भारत आणि चीनने भूतकाळात अनेकदा सीमेसंबंधी मुद्दे सोडविलेले आहेत.
सिंगापूर : भारत आणि चीनने भूतकाळात अनेकदा सीमेसंबंधी मुद्दे सोडविलेले आहेत. पण यावेळेस हा प्रश्न का सोडवू शकत नाहीत याचे कोणतेही कारण सांगता येणार नाही, असे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी बोलून दाखवले.
‘इंडिया -आसियान अँड द चेंजिंग जियोपॉलिटिक्स’विषयावर व्याख्यान देताना जयशंकर म्हणाले की, ही सीमा अतिशय दूरपर्यंत पसरलेली आहे.. जमिनी स्तरावर सीमेबाबत सहमती झालेली नाही. त्यामुळे असे मतभेद होऊ शकतात. हे मतभेद यंदाच प्रथम झाले नसून, यापूर्वीही ते झाले होते.
भूतान, भारत आणि चीन यांच्या सीमेजवळ डोकलाम भागात चिनी सैन्याने रस्त्याचे काम करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तीन आठवड्यांपासून या भागात दोन देशात तणाव निर्माण झाला आहे. भूतान या भागाला डोकलाम म्हणून ओळखते. या भागाचे भारतीय नाव डोका ला असून चीन याला डोंगलांग म्हणते. भारत आणि चीन यांच्यात जम्मू - काश्मीर ते अरुणाचल प्रदेशपर्यंत ३,४८८ किमी लांब सीमा आहे. यातील २२० किमीचे क्षेत्र सिक्किममध्ये येते.
जयशंकर म्हणाले की, भारत -चीन संबंधात सुधारणा झाल्यास याचा असियान आणि आशिया प्रशांत क्षेत्र आणि जागतिक पातळीवरही थेट परिणाम होईल. दोन महाशक्ती असून त्यांच्यात काही मुद्यावरुन वाद असू शकतात. या देशांना दीर्घ इतिहास आहे. अलिकडच्या काळातील इतिहास मात्र खडतर आहे. भारत-चीन संबंध एका उंचीपर्यंत पोहचलेले असल्यामुळे यातून फार काही गंभीर प्रश्न निर्माण होईल, असे वाटत नाही.
>भारतात होत असलेल्या परिवर्तनाचाही जयशंकर यांनी आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले की, पायाभूत सुविधा वाढविल्या जात आहेत. भारतातील अर्थव्यवस्था गतीने वाढत आहे. व्यापार करणे अधिक सोपे करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या व्याख्यानाचे आयोजन ली कुआन यिऊ स्कूल आॅफ पब्लिक पॉलिसी आणि भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने केले होते.