भारत-चीन त्रिस्तरीय चर्चेत युद्धसामग्री हटविण्यावर भर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 05:04 AM2020-07-13T05:04:37+5:302020-07-13T06:28:33+5:30
भारतात सीमेवर लष्करी अधिकारी, तर परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव दर्जाचे अधिकारी चिनी दूतावासातील अधिकाऱ्यांशी संवाद साधतील.
नवी दिल्ली : भारतामध्येचीनविरोधात रोष वाढल्याची झळ आता बीजिंगमध्येही जाणवू लागली आहे. चीनने पहिल्यांदाच त्रिस्तरीय चर्चेची तयारी दर्शवली आहे. भारतात सीमेवर लष्करी अधिकारी, तर परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव दर्जाचे अधिकारी चिनी दूतावासातील अधिकाऱ्यांशी संवाद साधतील. याबरोबरच चिनी परराष्ट्र मंत्रालयातील दक्षिण आशिया विभागातील अधिकाऱ्यांना भारतीय दूतावासातील अधिकाºयांना बीजिंगमध्ये चर्चेसाठी बोलावले आहे. दरम्यान, दोन्ही देशांचे सैनिक गलवान खोºयातून मागे हटले असून, गेल्या महिनाभरात सीमेवर तैनात केलेली अत्याधुनिक शस्त्रात्रे हटविण्यावर आता चर्चा सुरू होईल. चीनने अत्याधुनिक टँक, तर भारताने अत्याधुनिक रडार सीमेवर तैनात केले आहे.
भारत-चीनदरम्यान गेल्या पन्नास वर्षांत पहिल्यांदाच हिंसक झटापट झाली. त्याचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय जगात उमटले. कोरोनाचे सावट व आशिया खंडातील अशांततेमुळे अमेरिका, रशिया, फ्रान्स, जर्मनीसारखे मोठे देशही धास्तावले. भारताने चीनला सडेतोड उत्तर देताना त्यांच्या सैनिकांना माघार घेण्यास भाग पाडले. गेल्या दोन आठवड्यांपासून दोन्ही देशांचे सैनिक वेगवेगळ्या चौक्यांमधून मागे हटत असले तरी युद्धसामग्री अद्याप तेथेच आहे. ज्यात प्रामुख्याने टँक, रडारचा समावेश आहे.
चीनने जमवला आहे सीमेवर युद्धसाठा
चीनने मोठा युद्धसाठा सीमेवर जमवला आहे. लढाऊ हेलिकॉप्टर, शस्त्रसज्ज सैनिक, बांधकाम साहित्यदेखील पँगाँग सरोवराच्या परिसरात आढळले होते. हेच साहित्य हटविण्याचा आग्रह भारताचा आहे, तरच तणाव निवळेल.
च्भारताकडून आर्थिक आघाडीवरही चीनविरोधात मोठी मोर्चेबांधणी सुरू आहे. चीनसमवेत चर्चा सुरू असली तरी भारताने रशिया व जर्मनीकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रे खरेदी करण्याचा सौदा निश्चित केला आहे. असे असले तरी चीनने युद्धसाहित्य मागे नेल्यास भारतालाही तसेच करावे लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.