भारत-चीनने लडाखच्या गोगरातून सैन्य हटविले, स्थिती पूर्ववत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 08:42 AM2021-08-07T08:42:35+5:302021-08-07T08:43:30+5:30
india china faceoff: भारत आणि चीन लष्कराने पूर्व लडाखमधील गोगोरामधून आपापले सैन्य माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून या ठिकाणी कोंडी निर्माण होण्याआधीची स्थिती पूर्ववत करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : भारत आणि चीन लष्कराने पूर्व लडाखमधील गोगोरामधून आपापले सैन्य माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून या ठिकाणी कोंडी निर्माण होण्याआधीची स्थिती पूर्ववत करण्यात आली आहे.
४ ते ५ ऑगस्ट, असे दोन दिवस सैन्य माघारीची प्रक्रिया करण्यात आली. या ठिकाणी दोन्ही बाजुने करण्यात आलेली आलेली सर्व तात्पुरते बांधकामे पाडण्यात आली आहेत. याबाबत परस्पर खातरजमाही करण्यात आली, असे भारतील लष्कराने सांगितले.
गोगरा किंवा गस्ती ठिकाण १७ ए (पट्रोलिंग प्वाइंट-१७-ए) येथून सैन्य माघारीची प्रक्रिया दोन्ही लष्करांदरम्यान ३१ जुलै रोजी पूर्व लडाखमील चुशूल-मॉल्डो येथील झालेल्या बोलणीच्या बाराव्या फेरीचे फलित होय. या बैठकीत दोन्ही लष्करादरम्यान गोगरा परिसरातून सैन्य माघार घेण्यास सहमती झाली होती. मागच्या वर्षी मेपासून या ठिकाणी तणावपूर्व स्थिती निर्माण झाली होती, असे भारतीय लष्कराने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सैन्य माघारी करारानुसार दोन्ही लष्कराने टप्प्या-टप्प्याने, परस्पर समन्वय आणि सत्यापनाने सैन्य तैनाती बंद केली आहे.
दोन्ही लष्कराचे सैन्य आपापल्या कायमस्वरुपी तळावर आहेत. दोन्ही लष्कराने गोगरा आणि हॉटस्प्रिंगमधून अर्धवट सैन्य माघारी घेतले होते. तथापि, पँगॉँग त्सो सरोवराच्या दक्षिण काठावर संघर्ष झाल्याने सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. या भागातील स्थिती आधीप्रमाणे पूर्ववत करण्यात आली आहे.