भारत-नेपाळ सीमावाद आणि सुगौली करार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 05:10 AM2020-06-01T05:10:12+5:302020-06-01T05:10:26+5:30
नेपाळचा दावा चुकीचा : ब्रिटिशांनी हद्द निश्चित न केल्याने नेपाळकडून सातत्याने संभ्रम
विकास मिश्र।
भा रताने आपल्या हद्दीत कालपानी ते लिपुलेखपर्यंत रस्ता तयार केल्याने नेपाळ चांगलेच भडकले. या वादाची कारणमीमांसा करताना इतिहासाची पाने दोनशे वर्षे मागे उलटून पाहिली असता एक विशेष करार (तह) असल्याचे दिसते. नेपाळ ज्या भू-भागावर दावा करतो, तो भाग संस्थानिकांच्या काळात युद्धात नेपाळने जरूर जिंकला होता; परंतु इंग्रजांशी झालेल्या लढाईनंतर सुगौली करारातहत पूर्ण जमीन परत करावी लागली होती. भारताचा भू-भाग भारताच्या हिश्श्याला आला होता.
भीमसेन थापा नेपाळचे सर्वेसर्वा असतांना १८०६ च्या आसपासची ही कथा. गिर्वाणयुद्ध विक्रम शहा त्यावेळी राजे होते. त्यांचे वय ९ वर्षे असावे. १७९७ मध्ये त्यांचा जन्म झाला. दोन वर्षे वय असताना त्यांना १७९९ मध्ये नेपाळ नरेश करण्यात आले होते. ते अल्पवयीन असल्याने कारभार भीमसेन थापा चालवायचे. नंतर ते पंतप्रधान झाले. तेव्हा भारत विविध संस्थानांत विभागलेला होता. याचा फायदा घेत थापाने एकापाठोपाठ आक्रमण करीत आजचे हिमाचल आणि उत्तराखंडचा मोठा भाग जिंकला. कांगडा किल्ल्यापर्यंत नेपाळचे राज्य पसरले होते. गोरखांच्या बहादुरीपुढे भारतीय संस्थानिकांची फौज तग धरूशकली नाही. एवढेच नव्हे, सिक्कीमचा मोठा भागही नेपाळच्या कब्जात गेला. इंग्रजांनी युद्धासाठी कारण शोधले.
अवध इंग्रजासोबत आलेले होते आणि नेपाळसोबत सीमावाद चालू होता. त्यातूनच १ नोव्हेंबर १८१४ रोजी नेपाळ अािण ब्रिटिशांदरम्यान युद्ध सुरू झाले. १८१५ उजाडेपर्यंत गोरखा सैनिक पराभवाच्या उंबरठ्यावर आले.४ मार्च १८१६ ला दोन्ही बाजूंनी अधिकृतपणे सुगौली गावात तह (करार) झाला, तीच युद्धसमाप्तीची तारीख मानतात. नेपाळतर्फे राजगुरू गजराज मिश्र आणि ईस्ट इंडिया कंपनीतर्फे लेफ्ट. कर्नल ब्रॅडशॉ यांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारानंतर नेपाळला २५ वर्षांत जिंकलेला भाग ईस्ट इंडिया कंपनीला द्यावा लागला. तराई म्हणजे अवधच्या हिश्श्यातील काही भाग करारानंतर काही दिवसांनी नेपाळला परत करण्यात आला. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला; परंतु सुगौली करार कायम राहिला. ज्या रस्त्यावरून वाद आहे, तो भाग भारताचा आहे. मोघम सीमामुळे नेपाळकडून संभ्रम निर्माण केला जातो.
ब्रिटिश लष्करात गोरखा सैनिकांचा प्रवेश
च्सुगौली तहासोबत एक नवा अध्याय सुरू झाला आणि ब्रिटिश लष्करात गोरखांची भर्ती सुरू झाली. गोरखा बहादूर असल्याने त्यांना ब्रिटिश लष्करात प्रवेश करण्याची संधी मिळाली. ही प्रथा आजही कायम आहे. ब्रिटिश लष्कर दरवर्षी नेपाळला जाऊन गोरखा सैनिकांची भर्ती करते.
1857 मध्ये ब्रिटिशांविरुद्ध क्रांती झाली, तेव्हा ही क्रांती दडपण्यासाठी गोरख्यांनी मोठी भूमिका बजावली होती. यावर खुश होत, इंग्रजांनी नेपाळला तराई म्हणजे मिथिलाचा काही भाग परत केला.