भारत-पाक सीमा दोन वर्षांत सील!
By admin | Published: October 8, 2016 05:52 AM2016-10-08T05:52:58+5:302016-10-08T05:52:58+5:30
दहशतवाद्यांची होणारी घुसखोरी लक्षात घेता, दोन्ही देशांतील सीमा डिसेंबर २0१८पर्यंत पूर्णपणे बंद करण्यात येईल
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढता तणाव आणि तेथून दहशतवाद्यांची होणारी घुसखोरी लक्षात घेता, दोन्ही देशांतील सीमा डिसेंबर २0१८पर्यंत पूर्णपणे बंद करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी केली. दोन्ही देशांच्या ज्या सीमेवर नदी, समुद्र वा खाडी हा भाग आहे, तिथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सीमा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पहिल्या टप्प्यात जम्मू-काश्मीर व पंजाबमध्ये सीमा बंद करण्यात येणार असून, त्यासाठी २ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या दोन राज्यांची पाकला जोडणारी सीमा १७७८ किलोमीटर इतकी आहे. गुजरातची सीमा ५0८ किलोमीटर आणि राजस्थानची सीमा १0७३ किलोमीटर इतकी आहे. या उपक्रमाला ‘कॉम्प्रहेन्सिव बॉर्डर मॅनेजमेंट सिस्टम’ असे नाव देण्यात आले आहे. तीनपदरी काटेरी कुंपणही सर्वत्र असेल. यासंदर्भात इस्रायल सरकारची मदत घेण्यात येणार आहे.
पाकिस्तानातून काश्मीरमध्ये होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी आणि काश्मीरबरोबरच राजस्थान, गुजरात, पंजाब या राज्यांतील सीमेवरून घुसखोरीच्या शक्यतेमुळे सतत बाळगावी लागणारी सतर्कता या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. राजनाथ सिंग यांनी सीमा सुरक्षा दलाच्या कामाचा आणि भारतीय सीमांचा जेसलमेरमध्ये आढावा घेतला. तसेच त्यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल, गुजरात आणि राजस्थानचे गृहमंत्री प्रदीपसिंह जाडेजा व गुलाबचंद कटारिया तसेच जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव बृजराज मिश्रा यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चाही केली. राजनाथ सिंह म्हणाले की दोन देशांची एकूण सीमा ३३२३ किलोमीटरची असून, त्यापैकी २२८९ किलोमीटरची सीमा पूर्णत: बंद करण्याचे आम्ही ठरविले आहे. त्यातही २0३४ किलोमीटर सीमेवर सध्या काटेरी कुंपण आहे. पण घुसखोरीचे प्रमाण शून्यावर यावे, यासाठी तिथे अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात
येईल. त्यात सीसीटीव्ही कॅमेरे,
रडार, लेसर यंत्रणा, रात्रीच्या अंधारातही दिसेल, अशी यंत्रणा, डेटा रेकॉर्डिंग आदींचा त्यात समावेश असेल. सीमा सुरक्षा दलाची गस्त असलेला भाग २२८९ किलोमीटरचा असून, उर्वरित भाग नियंत्रण रेषेचा आहे आणि तो लष्कराच्या ताब्यात आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>सर्जिकलवरून राजकीय वाक्युद्ध
‘सर्जिकल स्ट्राइक्स’वरून सुरू झालेले राजकीय वाक्युद्ध आता दोन्ही बाजूंनी पेटले असून, देशातील प्रमुख पक्ष आणि प्रमुख नेते एकमेकांवर वाक्बाण सोडत आहेत.
> तडीपार झालेल्यांनी आम्हाला शिकवू नये - कपिल सिबल
स्वत:वर खुनाचे गुन्हे असणाऱ्यांनी, तडीपार झालेल्यांनी (अमित शाह यांना उद्देशून) आम्हाला शिकवू नये. जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना निर्माण व्हायला भाजपाच कारणीभूत. मसूद अज़हरला भाजपा सत्तेत असताना सोडण्यात
आले. त्याने पाकिस्तानात जैश-ए-मोहम्मद संघटना स्थापन केली.पाकिस्तानची लायकी माहीत असतानाही नवाज शरीफ यांच्या वाढदिवशी मोदींनी तिथे जाण्याची काय गरज होती?मोदी सरकारच्या काळात पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला, असे म्हणणे हा लष्कराचा अपमान आहे. भाजपाने माफी मागावी.
>दलालीची भाषा काँग्रेसलाच लागू : शाह
दलालीची भाषा काँग्रेसलाच लागू होते. ती त्यांनी स्वत:पुरती ठेवावी. राहुल गांधी यांच्या विधानाचा आपण निषेध करतो. स्ट्राइक्सचे आम्ही राजकारण केले नाही. सर्जिकल स्ट्राइक्सनंतर पाकमध्ये असलेला गोंधळ हा पुरेसा पुरावा आहे. स्ट्राइक्स झाले नाहीत, तर मग पाकने विशेष अधिवेशन का बोलावले? शरिफ इस्लामाबादमध्येच का ठाण मांडून आहेत?, अटलबिहारी वाजपेयी ज्यांना दुर्गा म्हणायचे, त्या इंदिरा गांधींमध्ये दोष होता का? राजीव गांधींमध्ये दोष होता का?
>राजकीय प्रचारासाठी सैनिकांना वापरू नका - राहुल गांधी
स्टा्रइक्सना माझा पूर्ण पाठिंबा असल्याचे मी आधीच स्पष्ट केले आहे. मात्र भाजपाच्या राजकीय बॅनर्स वा पोस्टर्सवर वा राजकीय प्रचारासाठी भारतीय लष्कराची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यास माझा अजिबात पाठिंबा नाही. राजकीय पोस्टर्सवर भारतीय सैनिकांची छायाचित्रे छापण्यास आणि अशा प्रकारे प्रसिद्धी मिळवण्यास माझा पूर्ण विरोध आहे. हा प्रकार जवानांच्या रक्ताची दलाली करण्यासारखा आहे. - पोलिटिकल वॉर सुरू/देश-परदेश
>दलालीसारखे शब्द वापरणे चुकीचे : केजरीवाल
राहुल गांधी यांनी दलालीसारख्या शब्दांचा वापर करू नये, राजकीय मतभेद दूर करून सर्जिकल स्ट्राइकच्या मुद्द्यावर भारतीय सैन्यासोबत उभे राहणे गरजेचे आहे.