भारत-पाक मैत्रीचा सेतू संवादातूनच

By admin | Published: June 4, 2016 03:48 AM2016-06-04T03:48:18+5:302016-06-04T03:52:10+5:30

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध सुधारावेत ही तेथील जनतेचीदेखील इच्छा आहे. दोघांमधील संबंध सुधारण्यासाठी चर्चा आवश्यक आहे. युद्धामुळे आणखी नव्या समस्या निर्माण होतात.

Indo-Pak Friendship Setu talks only through | भारत-पाक मैत्रीचा सेतू संवादातूनच

भारत-पाक मैत्रीचा सेतू संवादातूनच

Next

नागपूर : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध सुधारावेत ही तेथील जनतेचीदेखील इच्छा आहे. दोघांमधील संबंध सुधारण्यासाठी चर्चा आवश्यक आहे. युद्धामुळे आणखी नव्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे चर्चेतूनच विविध वादांवर तोडगा काढला जाऊ शकतो व शांतता प्रस्थापित होऊ शकते, असे मत पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी व्यक्त केले.
लोकमत वृत्तपत्र समूहाच्या ‘लोकमत नॉलेज फोरम’अंतर्गत आयोजित ‘इंडिया अ‍ॅण्ड पाकिस्तान : अ डायलॉग विदाऊट बॉर्डर्स’ या विशेष चर्चासत्रादरम्यान मुख्य वक्ता म्हणून ते शुक्रवारी बोलत होते. भारत आणि पाकिस्तानदरम्यान चालणाऱ्या शांतिप्रक्रियेला वैचारिक बळ प्रदान करण्यासाठी आयोजित या चर्चासत्राला थायलंड, म्यानमार व अफगाणिस्तान येथील भारताचे माजी राजदूत विवेक काटजू, भाजपाच्या विदेश घडामोडी विभागाचे अध्यक्ष शेषाद्री चारी, काँग्रेसच्या वरिष्ठ प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी, ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई हे प्रामुख्याने उपस्थित होते.
भारत-पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर काही वर्षांतच हे देश एकत्र येतील, असे अनेकांना वाटायचे. सुरुवातीच्या वर्षांमध्ये पाकिस्तानने फार वेगाने प्रगती केली. १९७०च्या दशकात पाकिस्तानचा विकास दर भारत आणि चीनपेक्षा जास्त होता. परंतु दहशतवादामुळे आमचे फार नुकसान झाले, असे अब्दुल बासित म्हणाले.
भारत-पाकिस्तानदरम्यान शांतिचर्चा होणे आवश्यक आहे. चर्चेतून प्रश्न सुटू शकतात व भारत सर्व मुद्यांवर बोलण्यास तयार आहे. पाकिस्तानमधील काही शक्तींना वाटते की चर्चा व्हायला नको आणि तेथील अस्थिर व्यवस्थेमुळे नेमके कुणाशी बोलावे असा भारतासमोर संभ्रम निर्माण होतो, असे प्रतिपादन शेषाद्री चारी यांनी केले.
उभय देशांत शांतता प्रस्थापित होण्यासाठी संगीत, कविता, साहित्य यांचा काहीच उपयोग नाही. तसेच हिंसा व युद्ध हा देखील पर्याय नाही. दोन्ही देशांनी त्यांचे समान हित कशात आहे, हे शोधून वाटचाल करणे हाच शांतता निर्माण करण्याचा उपाय आहे, असे स्पष्ट मत विवेक काटजू यांनी व्यक्त केले. गेल्या ६९ वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. आता त्याहून पुढे जाऊन विचार करायला हवा. संबंध सुधारण्यासाठी चर्चेसोबतच हिंदी सिनेमा, संंस्कृती यांच्यासारख्या बाबींचादेखील उपयोग व्हायला हवा, असे प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.
दोन्ही देशांना जवळ आणण्यासाठी जनतेमधील परस्पर संबंध वाढवायला हवे. नागरिकांना मिळणाऱ्या ‘व्हिसा’ची संख्या वाढवायला हवी. यासाठी जनतेनेही दबाव आणण्याची गरज आहे, असे जतीन देसाई यांनी सांगितले. भांडणातून या दोन्ही देशांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. संवाद आणि चर्चेतूनच भारत-पाकदरम्यान संबंध सुधारू शकतात, असे मत लोकमत मीडिया प्रा. लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी प्रास्ताविकादरम्यान व्यक्त केले.
‘लोकमत’चे ‘नॅशनल एडिटर’ हरीश गुप्ता यांनी यावेळी जनतेच्यावतीने मान्यवरांना विविध प्रश्न विचारले. ‘लोकमत समाचार’चे ‘प्रॉडक्ट हेड’ मतिन खान यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर ‘लोकमत समाचार’चे संपादक विकास मिश्रा यांनी आभार मानले.

‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांच्या संकल्पनेतून नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अब्दुल बासित यांनी कौतुक केले. विजय दर्डा हे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यासोबत मोरोक्को दौऱ्यावर असल्यामुळे ते उपस्थित नाहीत. त्यांची अनुपस्थिती जाणवते आहेच. विजय दर्डा पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले असताना दोन्ही देशांनी एकत्रित येऊन एका मनोरंजन वाहिनीची सुरुवात करावी, अशी सूचना केली होती. त्यांच्या या सूचनेचे स्वागत करून यासाठी एकत्रित पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे मत अब्दुल बासित यांनी व्यक्त केले.महात्मा गांधी यांना भारताच्या फाळणीचा निर्णय मंजूर नव्हता. त्यांनी याला विरोधदेखील केला होता. याशिवाय जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल यांनीसुद्धा फाळणीच्या निर्णयाला विरोध केला होता, असे वक्तव्य शेषाद्री चारी यांनी केले.

Web Title: Indo-Pak Friendship Setu talks only through

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.