Indo-Pak War 1971: पाकिस्तानचं विभाजन होऊन बांगलादेशाची निर्मिती; अखेर का झालं होतं भारत-पाक युद्ध?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 09:23 AM2021-12-16T09:23:43+5:302021-12-16T09:24:35+5:30
Vijay Diwas: १६ डिसेंबर १९७१ रोजी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला आणि नव्या बांगलादेशाची निर्मिती झाली. भारत-पाकिस्तान यांच्या फाळणीनंतर बांगलादेशाच्या निर्मितीची तयारी झाली
नवी दिल्ली – १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं होतं. १९६५ नंतर पाकिस्तानला पुन्हा एकदा भारताकडून पराभवाला सामोरं जावं लागलं. इतकचं नाही तर १९७१ च्या युद्धानंतर जगाच्या नकाशात आणखी एका देशाचा जन्म झाला. २४ वर्षातच पाकिस्तानचं विभाजन का झालं? असा प्रश्न निर्माण होऊ लागला. बांगलादेशाच्या निर्मितीचं बीज १९४७ मध्येच रोवलं गेले होते. भारत बांगलादेशाच्या पाठिमागे ठामपणे उभा राहिला.
१६ डिसेंबर १९७१ रोजी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला आणि नव्या बांगलादेशाची निर्मिती झाली. भारत-पाकिस्तान यांच्या फाळणीनंतर बांगलादेशाच्या निर्मितीची तयारी झाली. बंगाली अस्मिता आणि त्याची ओळख टिकवण्यासाठी तत्कालीन पूर्व पाकिस्तानात जातीय संघर्षाला सुरुवात झाली. परंतु त्याची सुरुवात १९५० मध्ये झाली होती. याचवर्षी भारतात संविधान लागू करण्यात आले होते ते पाहता पाकिस्ताननेही त्याची तयारी सुरू केली. त्या काळात पूर्व पाकिस्तानात बंगालींनी बांग्ला भाषेच्या उचित सन्मान देण्याच्या मागणीवरुन आंदोलन पुकारलं. काही दिवसांनी हे आंदोलन संपलं परंतु त्या मागणीनं हळूहळू बंडाची सुरुवात झाली.
पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानात वादाची ठिणगी
भारत-पाक विभाजनानंतर पाकिस्तानच्या पूर्व आणि पश्चिमी भागातील लोकांमध्ये वारंवार संघर्ष वाढला. भाषा, संस्कृती, राहणीमान, विचारांवर हा वाद पेटला. शेख मुजीबुर्रहमान यांनी पूर्व पाकिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढा सुरू केला. या सर्व घडामोडींमुळे अनेक बंगाली नेते पाकिस्तानच्या निशाण्यावर आले. पाकिस्तान दबावाखाली शेख मुजीबुर्रहमान आणि अन्य लोकांवर गुन्हे दाखल झाले. मात्र ही कारवाई पाकिस्तावर भारी पडली. पूर्व पाकिस्तान पाक लष्कराचा अत्याचार वाढत चालला होता. मार्च १९७१ रोजी पाकिस्तानी सैन्याने हद्द पार केली. पूर्व पाकिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या लोकांची निर्दयी हत्या केली. महिलांसोबत बलात्कार या घटना रोज घडत होत्या. त्यावेळी पूर्व पाकिस्तानातून भारतात येणाऱ्या शरणार्थींची संख्या वाढली. पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी भारतावर दबाव वाढला. २९ जुलै १९७१ रोजी भारतीय संसदेत पूर्व बंगालच्या सैनिकांना मदत करण्याची घोषणा केली गेली. ३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने भारताच्या अनेक शहरांवर हल्ले केले. तेव्हा भारताला युद्ध करण्याची घोषणा करावी लागली. अवघ्या १३ दिवसांत १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानी सैन्याने शरणागती पत्करत भारतासमोर हार मानली. त्यानंतर जगाच्या नकाशात बांगलादेशाची निर्मिती झाली.