हिंदू मुलींच्या धर्मांतरावरून भारत-पाक वाक्युद्ध; सुषमा स्वराज व पाकिस्तानी मंत्र्याचे ट्विटटोले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 05:26 AM2019-03-25T05:26:30+5:302019-03-25T05:26:43+5:30
स्वराज यांच्या या ट्विटटला पाकिस्तानच्या माहितीमंत्र्यांनी त्यांच्या देशाच्या अंतर्गत बाबीत भारत ढवळाढवळ करत असल्याचा आक्षेप घेतला. त्यास स्वराज यांनी लगेच ट्विटटरवर उत्तर दिले
नवी दिल्ली : सिंध प्रांतात दोन सख्ख्या बहिणी असलेल्या हिंदू अल्पवयीन मुलींचे अपहरण व धर्मांतर करून त्यांचा जबरदस्तीने विवाह लावल्याच्या घटनेवरून रविवारी भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व पाकिस्तानचे माहितीमंत्री चौधरी फौवाद हुसैन यांच्यात समाजमाध्यमातून तुंबळ वाक््युद्ध जुंंपले. यावरून या दोन्ही शेजारी देशांचे संबंध सध्या किती नाजूक अवस्थेत आहेत, हेच स्पष्ट झाले.
सिंध प्रांतात घोटकी जिल्ह्याच्या धारकी गावात राहणाऱ्या रविना (१३ वर्षे) व रीना (१५ वर्षे) या दोन बहिणींचे गावातील काही ‘वजनदार’ लोकांच्या टोळक्याने होळीच्या आदल्या दिवशी राहत्या घरातून अपहरण केले. यानंतर लगेचच या मुलींचा एक काझी निकाह लावत असल्याचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांत व्हायरल झाला. आणखी एका व्हिडीओमध्ये आपण स्वखुशीने इस्लामचा स्वीकार केल्याचे या दोन मुली सांगत असल्याचे दिसत होते. या प्रकरणाचा खूप गाजावाजा झाल्यानंतर पाकिस्तानचे माहितीमंत्री चौधरी फौवाद हुसैन यांनी उर्दूमध्ये ट्विट केले की, पंतप्रधान इम्रान खान यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, या दोन्ही मुलींची सुटका करण्यासाठी खंबीरपणे पावले उचलण्याचे आदेश सिंध व पंजाब प्रांतांच्या मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. इकडे सुषमा स्वराज यांनी यासंबंधी भारतीय माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त ट्विटटरवर टाकून त्यासोबत लिहिले की, या घटनेची माहिती घेऊन अहवाल पाठविण्यास मी पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तांना सांगितले आहे.
स्वराज यांच्या या ट्विटटला पाकिस्तानच्या माहितीमंत्र्यांनी त्यांच्या देशाच्या अंतर्गत बाबीत भारत ढवळाढवळ करत असल्याचा आक्षेप घेतला. त्यास स्वराज यांनी लगेच ट्विटटरवर उत्तर दिले : मंत्री महोदय चौधरी मी आमच्या उच्चायुक्तांकडून नुसता अहवाल मागविला असल्याचे लिहिले त्याने तुम्हाला एवढ्या मिरच्या झोंबल्या. त्यावरून तुमचेच मन तुम्हाला खात असल्याचे दिसते!
स्वराज यांचा हा टोमणा चौधरी फव्वाद हुसैन यांनी निमूटपणे स्वीकारला नाही. त्यांनीही स्वराज यांना तेवढ्याच तिखट शब्दांत उत्तर दिले : मॅडम, अल्पसंख्य समाजास दुय्यम वागणूक द्यायला हा मोदींचा भारत नाही. हा इम्रान खान यांचा नवा पाकिस्तान आहे. येथे आमच्या राष्ट्रध्वजातील पांढरा रंग हे अल्पसंख्य समाजाचे प्रतिनिधित्व आहे व आम्हाला तो रंगही (हिरव्या रंगाएवढाच) प्रिय आहे. तुम्हीही भारतातील अल्पसंख्य समाजांना असेच काळजीने वागवाल, अशी आशा आहे!
आणखी एका ट्विटटमध्ये पाकिस्तानच्या या मंत्र्याने लिहिले की, इतर देशांतील अल्पसंख्य समाजाच्या हक्कांविषयी कणव असलेले लोक भारत सरकारमध्ये आहेत, याचा आनंद होतो. स्वदेशातील अल्पसंख्यांप्रतीही हीच दृष्टी सद््बुद्धी तुम्हाला व्हावी, अशी माझी प्रामाणिकपणे आशा आहे. गुजरात व जम्मूमधील घटनांचे तुमच्या अंतरात्म्यावर दडपण असणार याचीही मला कल्पना आहे.
इम्रान खान यांनी संसदीय निवडणुकीच्या प्रचारात अल्पसंख्य समाजाचे रक्षण करणे व त्यांचे सक्तीने धर्मांतर व विवाह रोखण्यासाठी प्रभावी पावले उचलण्याचे आश्वासन दिले होते. पाकिस्तान हिंदू सेवा वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष संजेश धान्जा यांनी इम्रान खान यांना त्यांच्या या आश्वासनाचे स्मरण देऊन म्हटले की, पाकिस्तानात अल्पसंख्य समाजाचा नानाविध प्रकारे छळ अजूनही सुरू आहे. खास करून बंदुकीच्या जोरावर तरुण हिंदू मुली पळवून व धर्मांतर करून त्यांचे वयस्कर व्यक्तींशी विवाह लावण्याचे प्रकार सिंध ्प्रांतात सर्रास घडत असतात. आताच्या या ताज्या घटनेत दोन मुली पळविणारे त्या गावातील कोहबार व मलिक समाजातील लोक असल्याचे हिंदू समाजबांधवांचे म्हणणे आहे. घोटकी जिल्हा मुख्यालयासमोर अनेक वेळा धरणे आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी या ताज्या घटनेचा गुन्हा नोंदविला, असेही धान्जा यांनी सांगितले.
पाकमध्ये हिंदूंची संख्या ७५ ते ९० लाख
पाकिस्तानमध्ये हिंदू सर्वांत अल्पसंख्य समाज आहे. सरकारी आकडेवारीनुसार त्यांची संख्या ७५ लाखसांगितली जाते. परंतु, हिंदू समाजाच्या म्हणण्यानुसार ही संख्या ९० लाखांहून अधिक आहे. बहुतांश हिंदू सिंध प्रांतात असून तेथील मुस्लिमांशी त्यांचे संस्कृती, परंपरा व भाषा या बाबतीत साधर्म्य आहे.