सीमारेषेवर तणाव वाढला, भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या 5 चौक्या उद्धवस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 06:25 AM2019-02-27T06:25:08+5:302019-02-27T12:33:08+5:30
मंगळवारी भारतीय हवाई दलाच्या १२ मिराज-२000 विमानांनी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पाकच्या हवाई हद्दीत प्रवेश केला आणि बालाकोट, चाकोटी व मुझफ्फराबाद येथील दहशतवाद्यांच्या तळांवर बॉम्बहल्ले केले.
नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याचा बदला भारतीय हवाई दलाने घेतला असून यामुळे गर्भगळीत झालेल्या पाकिस्तानने आता एलओसीवरील नागरिकांच्या घरांचा आसरा घेण्यास सुरुवात केली आहे. घरांआडून पाकिस्तानचे सैनिक शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असून भारतीय जवानांवर गोळीबार आणि ग्रेनेड हल्ले करत आहेत. यामध्ये भारताचे 5 जवान जखमी झाले आहेत. तर पाकिस्तानचे 5 सैनिक मारले गेले आहेत. नौशेरा आणि बारामुल्ला भागात हे हल्ले करण्यात आले.
भारताच्या हल्ल्यानंतर काल सायंकाळी 6.30 वाजल्यापासून एलओसीवर पाकिस्तानने 12 ते 15 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत मोठी शस्त्रे डागली. यामध्ये उखळी तोफा आणि मिसाईलचाही समावेश होता. भारतीय जवानांच्या प्रत्युत्तरापासून वाचण्यासाठी पाकच्या लष्कराने एलओसी लगतच्या नागरिकांच्या घराचा आधार घेतला असून नागरी वस्ती असल्यामुळे भारतीय जवानांकडून केवळ पाकच्या चौक्यांवरच गोळीबार केला जात आहे. या नागरिकांना पाकिस्तानने ढाल बनविले असून यामुळे भारताचे 5 जवान जखमी झाले आहेत. तीन जणांना किरकोळ जखमा झाल्या असून दोघांना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.
भारतीय जवानांनी आजही सूज्ञपणा दाखविला असून वस्तीपासून दूर असलेल्या पाकच्या पोस्टना लक्ष्य करत आहेत. जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरामध्ये पाकिस्तानच्या 5 चौक्या उद्धवस्त करण्यात आल्या असून पाकिस्तानी सैनिकांनाही हानी पोहोचली आहे.
Pakistan troops were also seen firing mortars&missiles from civilian houses using villagers as shields.However,Indian Army targeted Pak posts away from civilian localities. In exchange of fire, our 5 soldiers suffered minor injuries, of which 2 were taken to hospital & are stable https://t.co/Abs2CE2A2m
— ANI (@ANI) February 26, 2019
दुसरीकडे शोपियान जिल्ह्यातील मेमंदेर भागात दहशतवाद्यांसोबत चकमक सुरु झाली आहे. एका घरामध्ये 3 ते 4 दहशतवादी लपल्याचे समजते. याबाबतची अधिक माहिती मिळालेली नाही.
#JammuAndKashmir: Encounter underway between terrorists and security forces in Memander area of Shopian district. More details awaited
— ANI (@ANI) February 26, 2019
मंगळवारी भारतीय हवाई दलाच्या १२ मिराज-२000 विमानांनी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पाकच्या हवाई हद्दीत प्रवेश केला आणि बालाकोट, चाकोटी व मुझफ्फराबाद येथील दहशतवाद्यांच्या तळांवर बॉम्बहल्ले केले. हे हल्ले २१ मिनिटे सुरू होते. या हल्ल्याने बालाकोटचा सारा परिसर हादरून गेला. तिन्ही दहशतवादी तळ जंगलांमध्ये होते. आसपासच्या गावांतील लोक घाबरून बाहेर आले. त्यांनी स्फोटांचे प्रचंड आवाज येत असल्याची माहिती पोलिसांना दिली. मात्र, पोलीस येईपर्यंत भारतीय हवाई दलाने आपली मोहीम फत्ते करून विमाने परतलीही होती.
या हल्ल्यात ३२५ दहशतवादी आणि त्यांचे २५ कमांडर ठार झाले. तब्बल ४८ वर्षांनी भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा ओलांडून ही कारवाई केली. या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तान भेदरला असून नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.
तब्बल ४८ वर्षांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा हवाई दलाच्या जवानांनी ओलांडली आहे. यापूर्वी माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी १९७१ साली अशी कारवाई केली होती आणि त्यातूनच बांगलादेश स्वतंत्र झाला होता.