भारत-अमेरिका संबंध नव्या उंचीवर
By Admin | Published: January 25, 2015 02:17 AM2015-01-25T02:17:13+5:302015-01-25T02:17:13+5:30
व्हाइट हाउसने बराक ओबामा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील चर्चेने जगातील दोन सर्वांत मोठ्या लोकशाही देशांतील संबंध एका नव्या उंचीवर झेप घेतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
व्यापक संदेश : व्हाइट हाउसच्या मते निमंत्रणाने उभय बाजूंना नवचैतन्य
वॉशिंग्टन : राष्ट्राध्यक्षांचा ऐतिहासिक दुसरा भारत दौरा ‘पारडे बदलणारा’ असल्याचे संबोधत व्हाइट हाउसने बराक ओबामा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील चर्चेने जगातील दोन सर्वांत मोठ्या लोकशाही देशांतील संबंध एका नव्या उंचीवर झेप घेतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
व्हाइट हाउसमधील दक्षिण आशियाचे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे वरिष्ठ संचालक फिल रीनेर यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, ‘राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा व तेथे प्रजासत्ताक दिनाच्या परेडला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणे, यामुळे निश्चितच दोन्ही देशांतील संबंध एका नव्या उंचीवर असतील. माझ्या दृष्टीने ही एक महत्त्वाची संधी आहे आणि दोन्ही देशांतील संबंधांसाठी ‘खूप फलदायी’ संधी म्हणून याची नोंद होईल. राष्ट्राध्यक्षांनी या नात्यासाठी खूप वेळ दिला असून, ते आमच्यातील भागीदारीला एक नव्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्नशील आहेत.’ रीनर अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत भारत व दक्षिण आशियाई प्रकरणातील प्रमुख जाणकार आहेत. राष्ट्राध्यक्षांच्या तीन दिवसीय भारत दौऱ्यात संरक्षण व सुरक्षा, स्वच्छ ऊर्जा आणि हवामान बदल तसेच अणू सहकार्य यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रगती झालेली दिसेल, असा विश्वासही रीनर यांनी व्यक्त केला. अंतराळ सहकार्य, कर्करोग संशोधन तसेच बौद्धिक संपदा यांसारख्या क्षेत्रांतही द्विपक्षीय सहकार्य वाढीला वाव आहे. फिल रीनर यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्षांनी मोदींचे प्रजासत्ताक दिनाच्या परेडला प्रमुथ अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण स्वीकारल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून या संधीचा लाभ केवळ प्रतीकात्मक पद्धतीने न घेता तो वास्तववादी असला पाहिजे असा स्पष्ट संदेश देण्यात. यामुळे या प्रतीकात्मक सन्मानाचा स्वीकार करण्याचा अर्थच या संधीचा एक व्यापक वास्तववादी संधी म्हणून वापर करणे हा असल्याचे स्पष्ट झाले.
ओबामा-मोदी यांच्यात गेल्या ३० सप्टेंबर रोजी झालेल्या चर्चेनंतर दोन्ही बाजूंच्या अधिकाऱ्यांत नवचैतन्य संचारले आहे. वरिष्ठ पातळीवरच सकारात्मक घडत असून, धोरणात्मक भागीदारीसह यात सुधार होत आहे. ओबामांना प्रजासत्ताक दिनाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी मोदींच्या आमंत्रणामुळे अमेरिकेत व्यापक संदेश गेल्याचेही रीनर म्हणाले.