इन्स्टाग्राम व्हिडीओसाठी फासावर लटकण्याचं नाटक; टेबल सरकलं अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 11:19 AM2021-12-15T11:19:49+5:302021-12-15T11:29:57+5:30
सोशल मीडियाचं वेड वाढतंय; एका व्हिडीओसाठी तरुणानं केलं फास लावण्याचं नाटक
भोपाळ: सोशल मीडियाच्या वेडापायी तरुणाई अनेकदा हद्द ओलांडते. सोशल मीडियाच्या नादामुळे जीव गमावल्याच्या अनेक घटना समोर येतात. क्षणिक आनंदासाठी तरुण तरुणी जीव धोक्यात घालतात. अशीच एक घटना मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये घडली आहे. इन्स्टाग्रामच्या व्हिडीओसाठी एक तरुण फास लावण्याचं नाटक करत होता. मात्र टेबल हललं आणि त्याला गळफास लागला.
इंदूरच्या हिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या लाहिया वसाहतीत वास्तव्यास असलेल्या १६ वर्षांच्या आदित्यचा मृत्यू झाला आहे. आदित्य दहावीत शिकत होता. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करण्याचा त्याला छंद होता. तो विविध प्रकारचे व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड करायचा. मंगळवारी त्यानं शेजारच्या मुलांना घरी बोलावलं. आपल्याला सुसाईड व्हिडीओ शूट करायचा असल्याचं त्यानं मुलांना सांगितलं.
आदित्यनं छताला फास लावला आणि खाली टेबल ठेवला. त्यानंतर टेबलवर चढून आदित्य फास लावण्याचं नाटक करू लागला. काही वेळ तो त्याच स्थितीत होता आणि अचानक टेबल सरकला. टेबल सरकताच व्हिडीओ चित्रित करणारी मुलं पळून गेली आणि आदित्य लटकत राहिला. थोड्या वेळात त्याचा मृत्यू झाला.
आदित्यचे आई वडील लग्नाला आणि लहान भाऊ क्लासला गेला असताना हा प्रकार घडला. काही वेळानं आदित्यचा भाऊ राजदीप घरी परतला. भाऊ फासला लटकलेला पाहून तो घाबरला. त्यानं शेजारच्यांना बोलावलं. त्यांनी आदित्यला खाली उतरवून जवळच्या रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पोलिसांनी शेजारच्यांकडे याबद्दल चौकशी केली. त्यातून घडलेला प्रकार समोर आला. पोलिसांनी आदित्यचा मोबाईल ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.