VIDEO: बस चालकाचा बेजबाबदारपणा जीवावर बेतला; चाकाखाली आल्यानं विद्यार्थ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 08:56 AM2022-02-02T08:56:31+5:302022-02-02T08:58:16+5:30
बसच्या चाकाखाली आल्यानं महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; चालकाविरोधात गुन्हा दाखल
इंदूर: मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. महाविद्यालयात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याचा बसखाली आल्यानं मृत्यू झाला. विद्यार्थी बसमध्ये चढत होता. मात्र तरीही चालकानं बस थांबवली नाही. त्यामुळे विद्यार्थी मागच्या चाकाखाली आला. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
इंदूरच्या भंवरकुआ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. अभिषेक पटेल असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. तो दमोहचा रहिवासी आहे. अभिषेक त्याच्या भावासह कॉलेजला जात होता. भाऊ बसमध्ये चढला. त्याच्या पाठोपाठ अभिषेक बसमध्ये चढत होता. मात्र त्याचवेळी चालकानं बस वेगात पळवली. अभिषेक बसच्या चाकाखाली आला.
इंदौर-भंवरकुआं इलाके में दर्दनाक सड़क हादसे में एक युवक की मौत,कॉलेज जाने के लिए बस में चढ़ रहा था युवक,पैर फिसलने से सड़क पर गिरा और ऊपर से निकल गयी सिटी बस, मौके पर दर्दनाक मौत,मृतक अभिषेक मुलतः दमोह का रहने वाला था,इंदौर में रहकर पढ़ाई करता था,भंवरकुआं पुलिस ने केस दर्ज किया pic.twitter.com/VhQki4uvBV
— vikas singh Chauhan (@vikassingh218) February 1, 2022
खंडवा रोड परिसरात राहणारे दीपक आणि अभिषेक हे दोन भाऊ कॉलेजला जाण्यासाठी घरातून निघाले होते. दोघेही खासगी कॉलेजमध्ये शिकतात. कॉलेजला जाण्यासाठी बस पकडत असताना अपघात झाला. दीपक बसमध्ये चढल्यावर त्याच्या पाठोपाठ अभिषेकनंही बसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकानं बस वेगात पळवली. त्यामुळे दारात असलेला अभिषेक रस्त्यावर पडला. पुढच्या काही क्षणांत बसचं चाक त्याच्यावरून गेलं. स्थानिकांच्या मदतीनं दीपकनं अभिषेकला रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्याचा मृत्यू झाला होता.
अपघाताची घटना रस्त्याशेजारी असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली. दीपक आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. बस चालकाच्या बेजबाबदारपणामुळे हा अपघात झाल्याचं भंवरकुआ पोलीस ठाण्याचे प्रभारी संतोष दुधी यांनी सांगितलं. या प्रकरणाचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.