इंद्राणी मुखर्जीचा कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न, वैद्यकीय अहवालातून माहिती उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 11:40 AM2018-04-12T11:40:53+5:302018-04-12T11:40:53+5:30
शीना बोरा हत्याकांडातील आरोपी असलेली इंद्राणी मुखर्जीनं कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे वृत्त समोर आले आहे.
मुंबई - शीना बोरा हत्याकांडातील आरोपी असलेली इंद्राणी मुखर्जीनं कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे वृत्त समोर आले आहे. ही धक्कादायक बाब हिंदुजा हॉस्पिटलच्या तपासणी अहवालाद्वारे समोर आली आहे. इंद्राणी मुखर्जीच्या लघवीच्या नमुन्याची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये अॅन्टी डिप्रेशन ड्रग बेंजोडायएजिपीनचे अतिरिक्त प्रमाण आढळून आले. यावरुन तिनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, इंद्राणी मुखर्जी आणखी एका प्रकरणात मुख्य साक्षीदार असल्याच्या पार्श्वभूमीवर जीवाला धोका असल्याची भीती तिनं व्यक्त केली आहे. या दोन्ही प्रकरणांत कारागृह प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. वैद्यकीय अहवालाद्वारे समोर आलेल्या माहितीनुसार, मुखर्जीच्या लघवीच्या नमुन्यांमध्ये औषधांचं अतिरिक्त प्रमाण आढळून आले. यावरुन इंद्राणीनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे जे.जे. हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले होते.
इंद्राणीला जे. जे. रुग्णालयातून डिस्चार्ज
दरम्यान, इंद्राणी मुखर्जीला बुधवारी (11 एप्रिल) दुपारी जे.जे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. ती भायखळा तुरुंगात शिक्षा भोगत आहे. कारागृहात बेशुद्ध झाल्याने शुक्रवारी रात्री तिला जे. जे. रुग्णालयात दाखल केले होते. औषधोपचारांना ती प्रतिसाद देत असून आता तिची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी सांगितले. जे. जे. रुग्णालयात इंद्राणीवर उपचार सुरू होते. प्रकृती स्थिर झाल्यानंतर बुधवारी व्हीलचेअरवरून तिची रवानगी कारागृहात करण्यात आली.