इंद्राणीला पैसा व उच्चभ्रू वर्गाचे आकर्षण होते - सिद्धार्थ दास
By admin | Published: September 1, 2015 11:11 AM2015-09-01T11:11:16+5:302015-09-01T11:22:46+5:30
मिखाईल व शीना ही माझीच मुलं असून इंद्राणीला नेहमीच उच्चभ्रू वर्ग व पैशाचे आकर्षण होते असा दावा इंद्राणीचे पहिले पती सिद्धार्थ दास यांनी केले आहे.
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १ - मिखाईल व शीना ही माझीच मुलं असून इंद्राणीला नेहमीच उच्चभ्रू वर्ग व पैशाचे आकर्षण होते असा दावा इंद्राणीचे पहिले पती सिद्धार्थ दास यांनी केले आहे. शीना बोरा हत्याप्रकरणात मुंबई पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
शीना बोरा हत्याप्रकरणात इंद्राणी मुखर्जी, तिचा दुसरा पती संजीव खन्ना व चालक श्याम रॉय यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मात्र इंद्राणी मुखर्जीचे पहिले पती सिद्धार्थ दास कुठे आहेत असा प्रश्न उपस्थित होता. अखेर सिद्धार्थ दास यांचा शोध लागला असून ते सध्या कोलकात्यात आहे. मंगळवारी सिद्धार्थ दास यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सिद्धार्थ दास म्हणाले, मी आणि इंद्राणी १९८९ पर्यंत मुलांसोबत राहत होतो, शीना व मिखाईल हे दोघेही माझीच मुलं असून हे सिद्ध करण्यासाठी मी डीएनए चाचणी करण्यासही तयार आहे. इंद्राणीला आधीपासूनच पैशा व उच्चभ्रू वर्गाचे आकर्षण होते, ती शीनाची हत्या करु शकते, शीनाची हत्या करणा-यांना मृत्यूदंडांची शिक्षा द्यायला हवी अशी मागणीही त्यांनी केली आहे. इंद्राणीशी कधीच औपचारिकरित्या लग्न केले नव्हते असेही त्यांनी म्हटले आहे.