शीना बोरा हत्या : इंद्राणीचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 05:18 AM2020-08-07T05:18:48+5:302020-08-07T05:19:26+5:30
शीना बोरा हत्या : प्रकृतीचे कारण विशेष न्यायालयाला अमान्य
मुंबई : शीना बोरा हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी सरकारी साक्षीदारांवर दबाव आणू शकते, असे म्हणत विशेष सीबीआय न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळला. प्रकृतीचे कारण देत यापूर्वी अनेक वेळा इंद्राणीने जामीन अर्ज केला होता. मात्र, दरवेळी न्यायालयाने जामीन नाकारला. अखेर डिसेंबर २०१९मध्ये इंद्राणीने केसच्या गुणवत्तेवर जामीन मागितला आणि बुधवारी न्यायालयाने तो अर्जही फेटाळला. पीटर मुखर्जीचा मुलगा राहुल मुखर्जी, तिचा आधीचा पती संजीव खन्नाची मुलगी विधी खन्ना यांची साक्ष अद्याप न्यायालयात नोंदवायची आहे, असे निरीक्षण विशेष न्यायालयाचे न्या. जे. सी. जगदाळे यांनी नोंदविले.
आरोपी प्रभावशाली आणि श्रीमंत व्यक्ती आहे, यात शंका नाही. त्यामुळे सरकारी वकिलांच्या साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे न्यायालयाने म्हटले. तर, जामिनावर सुटका करण्याची विनंती करताना मुखर्जीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, सरकारी वकिलांच्या आरोपांत तथ्य नाही. इंद्राणी निर्दोष आहे, हे सिद्ध करण्यासाठी १२० कागदपत्रे आपल्याकडे आहेत. गुन्हा घडला, हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही शास्त्रीय पुरावे पोलिसांकडे नाहीत. शीना बोराच्या हत्येचा कट इंद्राणीने रचला, यासंदर्भात सरकारी वकिलांनी सादर केलेल्या पुराव्यांत तारतम्य नाही, असा युक्तिवादही त्यांनी केला.
मात्र, खटल्याच्या या टप्प्यावर सरकारी वकिलांनी सादर केलेल्या पुराव्यांचे काय महत्त्व आहे, याचा निष्कर्ष काढू शकत नाही. त्यामुळे आरोपी व आरोपींच्या वकिलांनी हा खटला जलदगतीने संपवण्यासाठी सहकार्य करावे, असे म्हणत न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला.