लडाखमधील देमचूक येथे चिनी सैनिकांची घुसखोरी; दलाई लामांच्या कार्यक्रमांचा केला निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 09:27 AM2021-07-13T09:27:46+5:302021-07-13T09:29:11+5:30
दलाई लामांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाचा निषेध करण्यासाठी चिनी सैनिकांची घुसखोरी. चीनने केलेल्या आगळिकीची भारताकडून गंभीर दखल.
लेह : तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांच्या ६ जुलै रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्त भारतीयांनी आयोजिलेल्या कार्यक्रमांचा निषेध करण्यासाठी त्या दिवशी काही चिनी सैनिक व नागरिकांनी लडाखच्या देमचूक भागात घुसखोरी केली. चीनने केलेल्या या आगळिकीची भारताने अतिशय गंभीर दखल घेतली आहे. चीनने भारतीय हद्दीत याआधी केलेल्या घुसखोरीच्या प्रयत्नांमुळे दोन्ही देशांत निर्माण झालेला तणाव अद्यापही कायम आहे.
देमचूक येथे दलाई लामांच्या वाढदिवसानिमित्त आयोजिलेल्या कार्यक्रमांविरोधात लडाखमध्ये घुसखोरी केलेल्या चिनी सैनिक, नागरिकांनी निषेधाचे फलक व चीनचे राष्ट्रध्वज हाती घेतले होते. निषेध करून ते चीनच्या हद्दीत परत गेले. लडाखच्या सीमेवर पँगाँग तलाव भागामध्ये काही महिन्यांपूर्वी चीनने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत काही भारतीय जवान शहीद झाले होते. या प्रकरणानंतर भारत व चीनचे संबंध आणखी ताणले गेले.
मोदी यांनी बदलले धोरण
- दलाई लामा यांच्या ८६व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ जुलै रोजी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
- २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यानंतर मोदींनी दलाई लामा यांच्याशी संपर्क असल्याची कधीही जाहीर वाच्यता केली नव्हती.
- यावेळी प्रथमच मोदींनी एका ट्विटद्वारे सांगितले की, मी दलाई लामा यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
- तिबेटबाबत भारताने आणखी बदललेल्या धोरणाचे दर्शन मोदी यांच्या ट्विटमधून झाले. कोरोनाची साथ संपुष्टात आली की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दलाई लामा भेट घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती एका तिबेटी नेत्यानेही दिली आहे.