जगात महागाई घटली, भारतात मात्र वाढली! आवश्यक वस्तूंच्या किमती दुप्पट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 07:45 AM2023-02-23T07:45:32+5:302023-02-23T07:45:47+5:30
जानेवारीत जागतिक बाजारात युरियाचे भाव सर्वाधिक ४७.६ टक्के कमी झाले. भारतात मात्र ते ५.२ टक्के वाढले.
नवी दिल्ली - जानेवारीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात महागाई कमी झालेली असताना. भारतात मात्र वाढली आहे. गॅस, खते, कॉफी-चहा, कापूस आणि खाद्यतेल यांसारख्या १० वस्तूंचे दर भारतात दुप्पट झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र, ते ४८ टक्के स्वस्त झाले आहे. जानेवारीत किरकोळ क्षेत्रातील महागाईचा दर वाढून ६.५% होण्यामागेही हेच कारण होते. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये महागाई ६ टक्क्यांच्या खाली आली होती.
जानेवारीत जागतिक बाजारात युरियाचे भाव सर्वाधिक ४७.६ टक्के कमी झाले. भारतात मात्र ते ५.२ टक्के वाढले. नैसर्गिक गॅस जागतिक बाजारात २८.६ टक्के स्वस्त झाला. भारतात मात्र तो ९५ टक्के महागला.
कापसाची आवक घटली
यंदा कापसाची आवक ४० टक्के कमी आहे. भाववाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस घरातच राखून ठेवला आहे. शेंगदाण्याचे उत्पादन १६.४ टक्के कमी झाले आहे. त्यामुळे या दोन्ही वस्तू महाग होत आहेत, असे तज्ज्ञांचे मत आहे.
रुपयाची घसरण...
केडिया कमॉडिटीचे संचालक अजय केडिया यांनी सांगितले की, डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्यामुळे आयात वस्तूंच्या किमती वाढत आहेत.