महागाई दर घटला, रेपो दराचे काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 02:53 AM2018-09-14T02:53:59+5:302018-09-14T02:54:28+5:30
रिझर्व्ह बँकेचे पतधोरण आॅक्टोबरमध्ये; इंधन दरवाढीमुळे काळजी कायम
मुंबई : आॅगस्ट महिन्यातील महागाईचा दर ३.७० टक्क्यांपर्यंत घसरल्याने आता रिझर्व्ह बँकेने रेपो दरही कमी करावे, अशी अपेक्षा आर्थिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे. पण इंधन दरवाढ कायम आहे. त्यामुळे रेपो दर कमी होण्याची शक्यता सध्या तरी कमी आहे, असे बँकेतील सूत्रांचे म्हणणे आहे.
रेपो दरात वाढ केली की कर्जे महाग होतात. कर्जे महाग झाली की, बाजारातील क्रयशक्ती कमी होते व त्यातूनच महागाईवर नियंत्रण येते. यासाठीच रिझर्व्ह बँकेने जून व आॅगस्ट या दोन्ही महिन्यातील द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात पाव-पाव टक्का वाढ केली होती. परिणामी आॅगस्ट महिन्यात महागाईचा दर कमी झाला.
रिझर्व्ह बँक आता पुढील द्वैमासिक पतधोरण आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घोषित करणार आहे. त्याआधीच महागाईत घट झाल्याने वाढलेले रेपो दर कमी करण्याबाबत रिझर्व्ह बँकेने विचार करावा, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. पण इंधनदर सातत्याने वधारत आहेत. तसेच केंद्र सरकारने खरिपाच्या पीकांना दीडपट हमीभावाची घोषणा केली आहे. खरिपाची पीके या महिन्यापासून बाजारात येतील. दीडपट हमीभावामुळे त्यांचे दर तुलनेने अधिक असतील. हे पाहता महागाई आटोक्यात असेलच याची शाश्वती नाही. त्यामुळेच रेपो दर कमी होण्याची शक्यता नाही, असे स्टेट बँकेच्या आर्थिक संशोधन विभागाचेही म्हणणे आहे.
लक्ष्य ३.५० टक्क्यांचे
रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबरपर्यंत महागाई दर ३.५० टक्के किंवा त्याखाली आणण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. ते ध्यानात घेऊनच सलग दोनवेळा केलेल्या रेपो दरवाढीचे फलित आॅगस्ट महिन्यातील महागाई दराच्या रुपात दिसले. त्यामुळेच आता आॅक्टोबरच्या पतधोरणात आढाव्यात बँक पुन्हा रेपो दर वाढवेल. जेणेकरुन नोव्हेंबर किंवा डिसेंबरपर्यंत महागाई आणखी नियंत्रणात येईल. महागाई नियंत्रणात आली की जानेवारी २०१९ पासून रेपो दर कमी होऊ शकतील, असे बँकेतील सूत्रांचे म्हणणे आहे.