महागाई आता नोकऱ्यांवर उठली, अनेकांना मिळाला 'नारळ'; कंपन्यांकडून कर्मचारी कपात!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 07:25 AM2022-08-24T07:25:09+5:302022-08-24T07:25:34+5:30
जगातील अनेक देशांत महागाईने मंदीचा प्रभाव वाढत असल्यामुळे अनेक कंपन्यांनी खर्च कमी करण्यासाठी कर्मचारी कपात सुरू केली
नवी दिल्ली-
जगातील अनेक देशांत महागाईने मंदीचा प्रभाव वाढत असल्यामुळे अनेक कंपन्यांनी खर्च कमी करण्यासाठी कर्मचारी कपात सुरू केली असून भारतातही त्याचा परिणाम दिसून येऊ लागला आहे. भारतात अनेक स्टार्टअप कंपन्यांनी कर्मचारी संख्या कमी केली आहे.
स्मार्टफोन उत्पादक चिनी कंपनी शाओमीने आपल्या ९०० कर्मचाऱ्यांना काढले आहे. अमेरिकेतील अॅपल आणि मायक्रोसॉफ्ट यांसह अनेक कंपन्यांनीही नोकरकपात केली आहे.
प्लॅटफॉर्म क्रंचबेसनुसार यंदा अमेरिकेत जुलैपर्यंत ३२ हजार टेक कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. लेऑफ डॉट एफवायआयच्या माहितीनुसार १ एप्रिलपासून ३४२ टेक कंपन्या व स्टार्टअप कंपन्या यांनी ४३ हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले आहे.
भारतात नोकरभरती थांबवली
अॅपलने १०० कंत्राटी कामगारांना काढलं आहे. मायक्रोसॉफ्टने २ हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना काढले आहे. नेटफ्लिक्स, शॉपिफाई, कॉइनबेस आणि अलिबाबा यांसारख्या बड्या कंपन्यांनीही काही प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे. या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतातील नोकरभरती थांबवली आहे.
खर्चात ४० टक्के कपात
शेअरचॅट आणि मोजोचे चीफ कमर्शियल ऑफिसर अजित वर्गीस यांनी सांगितले की स्टार्टअप कंपन्या विपणन खर्चा ३० ते ४० टक्के कपात करीत आहेत. प्रस्थापित कंपन्यांतील खर्चकपात १० ते १५ टक्के आहे.
कर्मचारी कपात
ओला कॅब- २,१००
ब्लिकिट- १,६००
व्हाईटहॅट-ज्युनिअर- १,३००
लीडो लर्निंग- १,२००
अनअॅकेडमी- ९२५
वेदांतू- ६२४
कार्स २४- ६००
एमफाइन- ६००
ट्रेल- ४००
टॉपर- ३००
भारतात स्टार्टअप कंपन्यांनी १२ हजार कर्मचाऱ्यांना काढले
- २०२२ च्या पहिल्या सहा महिन्यांत भारतातील स्टार्टअप कंपन्यांनी १२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले आहे.
- हे वर्ष संपेपर्यंत ही संख्या ६० हजारापर्यंत पोहोचू शकते. कर्मचारी कपात करणाऱ्या कंपन्यांत ओला, ब्लिकिट, बायजूज, अनअॅकेडमी, वेदांतू, कार्स २४, मोबाइल प्रीमिअर लीग, लीडो लर्निंग, एमफाइन, ट्रेल आणि फरलॅको यांचा समावेश आहे.