पाकमध्ये महागाईचा भडका, पेट्रोल तब्बल २७२ रु. लिटर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 08:06 AM2023-02-17T08:06:01+5:302023-02-17T08:06:46+5:30
एका महिन्यात ५८ रुपयांनी महाग; आयएमएफची कर्जाची अट डोईजड
इस्लामाबाद/नवी दिल्ली : पाकिस्तानमध्येपेट्रोल-डिझेलच्या दरांनी विक्रमी पातळी गाठली आहे. सरकारने गुरुवारपासून पेट्रोलच्या दरात २२ रुपयांनी, तर डिझेलच्या दरात १७ रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे एक लिटर पेट्रोलची किंमत आता तब्बल २७२ रुपये, तर एक लिटर डिझेलची किंमत २८० रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या महिनाभरात पेट्रोल ५८ रुपयांनी, तर डिझेल ५३ रुपयांनी महागले आहे. त्यामुळे आर्थिक डबघाईला आलेल्या पाकिस्तानातील नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.
पाकिस्तानच्या वित्त विभागाने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत झालेल्या विक्रमी वाढीचे कारण पाकिस्तानी चलन (रुपया)च्या घसरणीला दिले आहे. सध्या पाकिस्तानमध्ये परकीय चलनाचे मोठे संकट आहे. त्यामुळे आयात-निर्यातीवर परिणाम होत आहे. महागाई वाढत आहे. त्यात ८ दिवस आयएमएफसोबत बैठक घेऊनही कर्ज मिळाले नाही. आयएमएफने कर्जासाठी कठोर अटी लादल्या आहेत. त्यात डिझेल आणि पेट्रोलच्या दरवाढीचा समावेश असल्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात वारंवार वाढ करण्यात येत आहे.
महागाई आणखी वाढणार
nपाकिस्तानमध्ये केवळ पेट्रोलच नाही, तर दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या रॉकेल, हलके डिझेल आणि हायस्पीड डिझेलच्या दरातही वाढ करण्यात आली आहे.
nत्यामुळे देशातील महागाई आणखी वाढणार आहे. मूडीजच्या मते, यामुळे २०२३च्या पहिल्या सहामाहीत (जूनपर्यंत) पाकिस्तानमधील महागाईचा दर ३३% पर्यंत वाढेल.
nदेशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी आयएमएफचे कर्जही पुरेसे ठरणार नाही, असेही मूडीजने म्हटले आहे.
कडाक्याच्या थंडीने पेट्रोल-डिझेल खाल्ले
nदेशातील इंधनाच्या मागणीत सर्वांत मोठी वाढ फेब्रुवारीमध्ये झाली आहे.
nगुरुवारी इंडस्ट्रीच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात कडाक्याच्या थंडीमुळे पेट्रोल आणि डिझेलचा वापर या महिन्यात दुहेरी अंकात वाढला आहे.
nआकडेवारीनुसार, फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात पेट्रोलची विक्री जवळपास १८ टक्क्यांनी वाढून १२.२ लाख टन झाली आहे.
n गेल्यावर्षी याच कालावधीत हा आकडा १०.०४ लाख टन होता. हा आकडा २०२१ च्या फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्याच्या तुलनेत १८.३ टक्के अधिक आहे.
भारतात काय स्थिती?
१३.६ टक्क्यांनी पेट्रोलची मासिक आधारावर भारतात मागणी वाढली आहे.
५.१ टक्क्यांची पेट्रोल मागणीत जानेवारी महिन्यात घट झाली होती.
२५ टक्क्यांनी डिझेलची विक्री १५ फेब्रुवारीदरम्यान वाढली आहे.
का वाढली मागणी?
थंडी वाढली तसेच ट्रक पुन्हा रस्त्यावर आल्याने आणि कृषी क्षेत्राने वेग घेतल्याने डिझेलची मागणी वाढल्याचे उद्योग सूत्रांनी सांगितले.