राज्यसभेत पुढील आठवड्यात महागाईवर होणार चर्चा?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 06:35 AM2022-07-28T06:35:48+5:302022-07-28T06:36:15+5:30
माफी मागितल्यानंतरच खासदारांचे निलंबन घेणार मागे - नायडू
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये निर्माण झालेली कोंडी लवकरच राज्यसभेत संपुष्टात येण्याची शक्यता आहे. विविध वस्तूंच्या दरवाढीसंदर्भात राज्यसभेत पुढील आठवड्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. सभागृहात केलेल्या गैरवर्तनाचे गांभीर्य निलंबित सदस्यांना लक्षात आले आणि त्यांनी माफी मागितली तरच निलंबनाची कारवाई मागे घेण्याची तयारी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी दर्शविली आहे.
यासंदर्भात राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू, विरोधी पक्षांचे नेते तसेच संबंधित खात्यांचे मंत्री यांची बुधवारी महत्वाची बैठक झाली. राज्यसभेतील १९ खासदारांचे झालेले निलंबन ही मोठी संख्या आहे. हे निलंबन रद्द करावे अशी आग्रही मागणी विरोधी पक्षनेत्यांनी राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांच्याकडे केली. तसेच दरवाढीसंदर्भात राज्यसभेत चर्चा करण्यासाठी दिवस निश्चित केला जावा असेही विरोधी पक्षांतर्फे सांगण्यात आले.
या बैठकीत केंद्रीय संसदीय कामकाज खात्याचे मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, वित्तमंत्री निर्मला सीतारामन या कोरोनातून पूर्णपणे बऱ्या झाल्यानंतर दरवाढीच्या मुद्द्यावरील चर्चेला नक्की उत्तर देतील. राज्यसभाखासदारांचे निलंबन रद्द केल्यानंतर किंवा निलंबनाचा कालावधी या आठवड्याच्या
अखेरीस संपल्यानंतर लवकरच दरवाढीच्या मुद्द्यावर राज्यसभेत चर्चा व्हावी अशी मागणी विरोधकांनी केली.
त्यावेळी ६३ सदस्य झाले होते निलंबित
१९८९ साली लोकसभेच्या ६३ सदस्यांना गैरवर्तनाबद्दल निलंबित करण्यात आले होते. २०१५ साली २५ खासदारांना गैरवर्तनाबद्दल निलंबित केले होते. त्याचे दाखले नायडू यांनी विरोधी पक्षनेत्यांना दिले.
केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या प्रकृतीबद्दल नायडू यांनी विचारपूस केली. दरवाढीच्या प्रश्नावर सभागृहात त्या कधी उत्तर देऊ शकतील याबद्दलही त्यांच्याशी नायडू यांनी चर्चा केली.
‘पुन्हा अशी चूक करू नका’
राज्यसभेच्या कामकाजाचे व्हिडिओ चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर झळकविणाऱ्या एका खासदाराला सभापती व्यंकय्या नायडू यांनी बोलावून घेतले. त्या खासदाराच्या कृतीमुळे सभागृहाच्या नियमांचा भंग झाला आहे हे सभापतींनी त्यांना निदर्शनास आणून दिले. पुन्हा अशी चूक करू नका असा इशाराही या खासदाराला नायडू यांनी दिला.