जेईई अॅडव्हान्समध्येही ‘लातूर पॅटर्न’चा दबदबा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2018 10:39 PM2018-06-10T22:39:40+5:302018-06-10T22:39:40+5:30
जेईई अॅडव्हान्स परीक्षेतही लातूर पॅटर्नचा दबदबा कायम राहिला असून, राजर्षी शाहू महाविद्यालयातील १८, दयानंद विज्ञानचे २ तर श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञानचे ३ विद्यार्थी आयआयटी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.
लातूर : जेईई अॅडव्हान्स परीक्षेतही लातूर पॅटर्नचा दबदबा कायम राहिला असून, राजर्षी शाहू महाविद्यालयातील १८, दयानंद विज्ञानचे २ तर श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञानचे ३ विद्यार्थी आयआयटी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.
राजर्षी शाहू महाविद्यालयातून ८० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यामध्ये नदीम निजाम शेख हा राष्ट्रीय पातळीवर सर्वसाधारण संवर्गातून १४७५ रँक प्राप्त करून प्रथम आला. तर मंगेश शिवाजी चंद्रवंशी हा २२४५ वा रँक मिळवून द्वितीय आला. तसेच तिसरा आलेला उबेद मो. जावेद शेख हा ओबीसी संवर्गातून देशात ३९७ व्या तर सर्वसाधारण संवर्गात २८२५ क्रमांकावर आहे. तसेच ऋतुजा भगवान केंद्रे ही ओबीसी संवर्गातून ५२५ क्रमांकावर व सर्वसाधारण गटात ३५४८ क्रमांकावर आहे. समीक्षा उमेश पाटील ही विद्यार्थिनी सर्वसाधारण संवर्गातून ८४७९ क्रमांकावर आहे.
तसेच यावर्षी दयानंद विज्ञान महाविद्यालयानेही आपली परंपरा कायम ठेवली असून, एससी प्रवर्गातून १०५६ क्रमांक मिळवून तेजस माने महाविद्यालयात प्रथम आला आहे. तसेच एसटी प्रवर्गात प्रिया कोलंगणे हिने ७३१ क्रमांक मिळवून आयआयटीचा प्रवेश निश्चित केला आहे.
तसेच श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील ३ विद्यार्थ्यांनी जेईई अॅडव्हान्स परीक्षेत यश मिळविले आहे.
- यावर्षीपासून मुलींसाठी आयआयटी व एनआयटीमध्ये २० टक्के जागांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली असून, ज्या विद्यार्थिनींनी कटआॅफपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत, अशा विद्यार्थिनींना या जागांसाठी प्रामुख्याने प्रवेश दिला जाणार आहे.
- यावर्षीच्या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना गुणवत्ता क्रमांक (रँक) देत असताना केवळ उपलब्ध जागा एवढेच गुणवत्ता क्रमांक देण्यात आलेले आहेत.