जयललितांच्या प्रकृतीची माहिती द्या
By admin | Published: October 5, 2016 04:55 AM2016-10-05T04:55:35+5:302016-10-05T04:55:35+5:30
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत निवेदन प्रसृत केल्यामुळे लोकांची काळजी कमी होईल, असे निरीक्षण नोंदवून मद्रास उच्च न्यायालयाने
चेन्नई : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत निवेदन प्रसृत केल्यामुळे लोकांची काळजी कमी होईल, असे निरीक्षण नोंदवून मद्रास उच्च न्यायालयाने बुधवारपर्यंत या मुद्यावर म्हणणे मांडण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले. जयललिता यांच्यावर येथील एका रुग्णालयात २२ सप्टेंबरपासून उपचार सुरू आहेत.
सरकारने जयललिता यांच्या प्रकृतीची माहिती द्यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते ‘ट्राफिक’ रामास्वामी यांनी दाखल केली असून, या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने वरील तोंडी निरीक्षण नोंदविले. मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबाबत सरकारशी चर्चा करून उद्यापर्यंत सरकारचे म्हणणे मांडा, असे निर्देश न्यायालयाने तामिळनाडूचे अतिरिक्त महाधिवक्ता सी. मणिशंकर यांना दिले. रुग्णालय जयललिता यांच्या प्रकृतीबाबत दररोज मेडिकल बुलेटिन जारी करीत असून, त्यात त्यांच्यावर करण्यात आलेल्या उपचाराचीही माहिती असते, असे मणिशंकर यांनी न्यायालयाला सांगितले. तथापि, रुग्णालय जरी मेडिकल बुलेटिन जारी करीत असले तरी त्या राज्याच्या मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत निवेदन जारी केल्यास लोकांची काळजी कमी होईल, असे मत न्यायालयाने नोंदविले.
रुग्णालयात जयललितांनी घेतलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीचे फोटोही जारी करण्यात यावेत, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)