मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या खुर्चीला धोका नसल्याची सुत्रांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2017 05:24 PM2017-08-26T17:24:24+5:302017-08-26T17:26:26+5:30
हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना भाजपा पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत बोलावलं होतं.
नवी दिल्ली, दि. 26- हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना भाजपा पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत बोलावलं होतं. गुरमीत राम रहीम यांच्या अटकेनंतर हरयाणामध्ये झालेल्या हिंसाचारामुळे त्यांना दिल्लीतून बोलावणं आलं होतं. राज्यात उफाळून आलेल्या हिंसाचारामुळे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची खुर्ची जाणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. याविषयी दिल्लीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्त्वाखाली चर्चादेखील करण्यात आली. पण यामध्ये खट्टर यांच्या राजीनाम्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खट्टर यांच्या मुख्यमंत्रीपदाला कोणताही धोका नाही. यासोबतच पक्षाकडून त्यांच्याकडे स्पष्टीकरणही मागितलं जाणार नाही, अशी माहिती सुत्रांकडून मिळते आहे.
हरयाणातील स्थितीवर चर्चा करण्यासाठी पक्षाध्यक्ष अमित शहांनी दिल्लीत बैठक बोलावली होती. या बैठकीला हरयाणाचे प्रभारी अनिल जैन, कैलाश विजयवर्गीय उपस्थित होते. या बैठकीनंतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा राजीनामा घेण्याचा विचार सध्या तरी पक्षाच्या नेतृत्त्वाकडून करण्यात आलेला नाही. याशिवाय खट्टर यांना दिल्लीत बोलावून त्यांना समज दिली जाणार असल्याचं वृत्त चुकीचं असल्याचंही भाजपाकडून सांगण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री खट्टर यांना पक्ष नेतृत्त्वाने दिल्लीत बोलावल्याची बातमी चुकीची आहे, असे प्रभारी अनिल जैन यांनी सांगितलं. याशिवाय विरोधकांनी या प्रकरणाचं राजकारण करु नये, असंही त्यांनी म्हटलं आहे. ‘डेरा आणि त्याचं महत्त्व नाकारता येणार नाही,’ असं अमित शहा यांनी बैठकीत बोलाताना म्हटलं. ‘डेराचं महत्त्व लक्षात घेता परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळण्यात आली,’ असं ते पुढे म्हणाले.
प्रसारमाध्यमांनी हरयाणामधील या परिस्थितीसाठी मनोहर लाल खट्टर यांना जबाबदार धरलं आहे. राज्य सरकारच्या निष्क्रीयतेमुळे ही परिस्थिती उदभवल्याचा आरोप प्रसारमाध्यमांनी केला आहे. मनोहर लाल खट्टर यांनी 26 ऑक्टोंबर 2014 रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर तीनवर्षात तीनवेळा हरयाणात अशा प्रकारचा हिंसाचार झाला आहे.