'हो सर्जिकल स्ट्राईक झाला होता', PoKमधील पोलीस अधिका-याची माहिती
By admin | Published: October 6, 2016 11:28 AM2016-10-06T11:28:24+5:302016-10-06T11:28:24+5:30
भारतीय लष्कराने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांसोबत पाच पाकिस्तानी सैनिकही मारले गेले होते
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - भारतीय लष्कराने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांसोबत पाच पाकिस्तानी सैनिकही मारले गेले होते. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने ही माहिती दिल्याचं वृत्त सीएनएन न्यूज 18 ने दिलं आहे.
मीरपूरमधील विशेष पथकाचे पोलीस अधिक्षक गुलाम अकबर यांच्यासोबत झालेलं बोलणं रेकॉर्ड करण्यात आलं आहे. 29 सप्टेंबरच्या रात्री सर्जिकल स्ट्राईक झाल्याचं कबूल केल्याचं यामध्ये स्पष्ट ऐकू येत आहे. 'पाकिस्तानी अधिका-यांना साधी याची कल्पना आणि माहितीही नव्हती. या हल्ल्यात पाच सैनिक मारले गेले. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांचे मृतदेह तात्काळ तेथून हटवले', असंही गुलाम अकबर यांनी सांगितलं आहे.
'भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने संपुर्ण परिसराला घेरलं होतं. सर्व मृतदेह रुग्णवाहिकेत टाकून नेण्यात आले. जवळच्या गावांमध्ये हे सर्व मृतदेह दफन करण्यात आल्याचं', गुलाम अकबर बोलले आहेत. अकबर यांनी किती वाजता सर्जिकल स्ट्राईक झाला हेदेखील सांगितलं असून 'रात्री दोन वाजल्यापासून ते पहाटे चार ते पाच वाजेपर्यंत म्हणजे तीन ते चार तास हल्ला सुरु होता', असं सांगितलं आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी भारतीय लष्करातर्फे सर्जिकल स्ट्राइक्सचा व्हिडीओ केंद्राला सादर करण्यात आला. तो संपादित स्वरूपात सर्वांसाठी खुला करावा, त्यामुळे शंका उपस्थित करणाऱ्यांचे, तसेच पाकिस्तानचे तोंड बंद होईल, असे भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.