ऑनलाइन सट्ट्याच्या जाहिराती दाखवू नका, I&B मंत्रालयाने जारी केली अॅडव्हायजरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 07:23 PM2022-06-13T19:23:26+5:302022-06-13T19:24:56+5:30
Ministry of I&B: सध्या विविध सोशल मीडिया आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सट्ट्याच्या जाहिराती दाखवल्या जातात. याबाबत सरकारने कठोर पाऊले उचलली आहेत.
नवी दिल्ली: सध्या विविध सोशल मीडिया आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सट्ट्याच्या जाहिराती दाखवल्या जातात. याबाबत सरकारने कठोर पाऊले उचलली आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सोमवारी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाला इशारा देत ऑनलाइन बेटिंगच्या जाहिराती टाळण्यास सांगितले आहे.
ऑनलाइन सट्ट्याची जाहिरात दिशाभूल करणारी
सरकारने इशारा दिला की, देशाच्या बहुतेक भागांमध्ये बेटिंग आणि जुगार खेळणे बेकायदेशीर आहे. यामुळे तरुण मुलांसाठी प्रचंड आर्थिक आणि सामाजिक-आर्थिक धोके निर्माण होत आहेत. ऑनलाइन सट्ट्याच्या जाहिराती प्रतिबंधित क्रियाकलापांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देतात. या जाहिराती फसव्या आहेत आणि त्या ग्राहक संरक्षण कायदा 2019, केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स रेग्युलेशन अॅक्ट, 1995 आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया अॅक्ट, 1978 अंतर्गत जाहिरात कोडने विहित केलेल्या पत्रकारितेच्या आचरणाच्या मानकांशी सुसंगत नाहीत.
📢 I & B Ministry issues 'Advisory on Advertisement of Online Betting Platforms'.
— Ministry of Information and Broadcasting (@MIB_India) June 13, 2022
Print & Electronic Media advised to refrain from publishing ads of online betting platforms.
Online & Social Media advised not to display such ads in India.
Details👇https://t.co/zWxQ6SrOstpic.twitter.com/1jkTlG4NgA
अॅडव्हाजरीमध्ये सल्ला दिला
सरकारने हा इशारा व्यापक सार्वजनिक हितासाठी जारी केला आहे. तसेच, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्मसाठी जाहिराती प्रकाशित करणे टाळण्याचा सल्लाही दिला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 4 डिसेंबर 2020 रोजी खाजगी सॅटेलाईट टीव्ही चॅनेलसाठी एक अॅडव्हाजयरी जारी केली होती, ज्यात प्रिंट आणि ऑडिओ व्हिज्युअल जाहिरातींसाठी ऑनलाइन गेमिंगच्या जाहिरातींवर जाहिरात मानक परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले होते.
सट्टेबाजीच्या जाहिरातींना मुले बळी पडतात
गेल्या काही वर्षांपासून विविध वेबसाइट्सवर सट्टेबाजीच्या जाहिराती पाहायला मिळत होत्या. अशा जाहिरातींमध्ये हाय-स्पीड चेतावणी देखील दिली जाते की, बेटिंग गेम काळजीपूर्वक खेळा, ते व्यसन असू शकते. अलीकडच्या काळात अनेक तरुणांना जाहिरातींमधून सट्टेबाजीचे व्यसन लागलेले दिसून येत आहे. विशेष म्हणजे, देशात सोशल मीडियाच्या विस्तारामुळे सट्टेबाजीच्या जाहिरातींचा लक्षणीय विस्तार झाला आहे.