बिहारमधील बसच्या 'त्या' आगीतून संशयाचा धूर, २७ जणांच्या मृत्यूचंही गूढ!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2018 02:45 PM2018-05-04T14:45:48+5:302018-05-04T14:45:48+5:30
अपघाताबद्दल समोर आलेली नवी माहिती धक्कादायक
पटना: बिहारमध्ये झालेल्या अपघात प्रकरणात आता नवी माहिती समोर आलीय. या अपघातात एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नसल्याचं बिहारच्या आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यानं सांगितलंय. या बसमधून 13 जण प्रवासी करत होते. मात्र अपघातानंतर कोणत्याही व्यक्तीचा मृतदेह मिळाली नसल्याची माहिती मंत्री दिनेश चंद्र यादव दिली. विशेष म्हणजे या अपघातात 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती खुद्द दिनेश चंद्र यादव यांनी काल दिली होती. या दुर्घटनेनंतर बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतदेखील जाहीर केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी या घटनेनंतर ट्विट करुन शोक व्यक्त केला होता. या अपघाताची माहिती जाहीर करण्याची घाई केल्याबद्दल बिहार सरकारवर टीका होतेय. ही घटना गुरुवारी रात्री घडली. बिहारच्या मोतिहारी जिल्ह्याच्या कोटवामध्ये मुजफ्फरपूरहून दिल्लीला जाणारी बस पुलावरुन कोसळली. यानंतर बसला आग लागली. या बसमध्ये 30 प्रवासी होते. त्यातील 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सुरुवातीला समोर आली होती. बिहार सरकारचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री दिनेश चंद्र यादव यांनीदेखील 27 प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला होता.
शुक्रवारी बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतर वेगळीच माहिती समोर आली. अपघातग्रस्त बसमध्ये एकही मृतदेह न मिळाल्याची माहिती मुजफ्फरपूर झोनचे पोलीस महानिरीक्षक अनिल कुमार यांनी दिली. या अपघातातून 8 लोकांना वाचवण्यात आल्याचंही कुमार यांनी सांगितली. यानंतर स्पष्टीकरण देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन मंत्री दिनेश चंद्र यादव माध्यमांसमोर आले.