“काहीही मोफत द्यायला नको; मीही गरीब घरातून आलोय, पण...”: नारायण मूर्ती थेट बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 04:00 PM2023-11-30T16:00:25+5:302023-11-30T16:01:25+5:30
Narayana Murthy: आठवड्यात ७० तास काम करायला हवे, असे विधान चर्चेत असताना नारायण मूर्ती यांनी गोष्टी मोफत देण्यावरून मत मांडले आहे.
Narayana Murthy:इन्फोसिस कंपनीचे सहसंस्थापक नारायण मूर्ती पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आठवड्याभरात ७० तास काम करायला हवे, असे विधान नारायण मूर्ती यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. या विधानावरून अनेक चर्चा रंगल्या होत्या. यानंतर आता गोष्टी मोफत देण्यावरून नारायण मूर्ती यांनी केलेले विधान चर्चेत आले आहे.
एका कार्यक्रमात बोलताना नारायण मूर्ती म्हणाले की, देशात सध्या देण्यात येणाऱ्या मोफत सेवेविरोधात नाही. पण सरकार देत असलेल्या मोफत सेवा आणि सबसिडी घेताना लाभार्थ्यांनी समाजाच्या हितासाठी योगदान दिले पाहिजे. जेव्हा तुम्ही सेवांचा लाभ घेता, सबसिडीचा फायदा मिळवता, तर त्या मोबदल्यात काही तरी परत करण्याची तयारी असायला हवी. भारतासारख्या गरीब राष्ट्राला समृद्ध करण्यासाठी कंपोसिनेट कॅपिटॅलिझम याची गरज असल्याचे नारायण मूर्ती यांनी सांगितले.
मीदेखील एका गरीब घरातून आलो आहे
मोफत सेवा देण्याच्या विरोधात नाही, कारण मीदेखील एका गरीब घरातून आलो आहे. मला वाटते की, जे मोफत सेवांचा आणि सबसिडीचा लाभ घेत आहेत. त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा ठेवण्यात गैर नाही. निदान असा लाभार्थ्यांच्या पुढील पिढ्या, त्यांचा मुलगा, नातू यांनी अधिक चांगल्या शाळांमध्ये चांगली कामगिरी बजावणे, एकूणच समाजात चांगली कामगिरी बजावणे अशा जबाबदाऱ्या घेऊ शकतात, असे नारायण मूर्ती यांनी सांगितले.
दरम्यान, जर एखादे सरकार मोफत वीज पुरवित असेल तर अगोदर प्राथमिक शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती २० टक्क्यांनी वाढवून दाखवा, तर तुम्हाला ही सेवा देऊ, असे प्रयत्न करायला हवे. मुक्त बाजार आणि उद्योगीपणा या दोन खांबावर आधारीत भांडवलशाहीच कोणत्याही देशाची गरिबी संपविण्याचे एकमात्र साधन आहे, असे ते म्हणाले.